जत घाटगेवाडी रस्त्याचे कामासाठी यंत्रणेला आदेश द्यावेत: नागरिकांची मागणी

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

     आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत घाटगेवाडी या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत अशी मागणी जत येथील रामरावनगर व घाटगेवाडी ग्रामस्थाकडून होऊ लागली आहे.     
      जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत नगरपरिषदेसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथराव शिंदे यांच्या  खात्याकडून दोन कोटी रूपये मंजूर केले असून यामध्ये जत घाटगेवाडी या रस्त्याचे कामही मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आमदार सावंत यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले हे काम मंजूर केल्याने आ.सावंत यांचे आभार मानले असून हे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी केली आहे.

     जत घाटगेवाडी हा रस्ता ७ किलोमिटर अंतराचा असून सद्या या रस्त्याचे पूर्वी केलेले डांबरीकरण बहुतांशी ठिकाणी  निघून गेले असून रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाणारे येणारे वाहनचालक यांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. यावेळी छोटे अपघात ही होत आहेत.
   पावसाळ्यात तर या रस्त्यावरून ये-जा करताना चिखलामुळे धोक्याचे झाले आहे.    ही परिस्थिती आमदार सावंत यांनी स्वत: जागेवर जावून पाहिल्यानंतर त्यानी जत घाटगेवाडी या श्री. अंबाबाई पावतका रस्त्यापर्यंतचे डांबरीकरणचे काम नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर केले असून या कामाला लवकरात लवकर सुरूवात करावी अशी मागणी जत रामरावनगर व घाटगेवाडी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे.