अनिल मदने
जत /प्रतिनिधी:
डी.बी.एल.कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व अपघाती गतिरोधक काढणेबाबत तसेच गतिरोधकामुळे अपघात झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक यांनी जतचे तहसिलदार सचिन पाटील व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्याकडे केली आहे.
बेवनूर ते जुनोनी हा रस्ता डी.बी.एल.कंपनीच्या अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे पुर्णपणे खचून मोठमोठे खडे पडलेले आहेत.त्यामुळे नागरिकांना जाण्या-येण्यासाठी व वाहने चालवताना अतिशय धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे.अशा परिस्थितीत वाहनांचे तर नुकसान होतच आहे,परंतु नागरिकांच्या जीविताससुध्दा धोका निर्माण झालेला आहे.बेवनूरचे मोटारसायकलस्वार दादासो शंकर सरगर हे दि. २४/०९/२०२० रोजी बेवनूर – जुनोनी रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच वसंत धोंडीराम माने हे दि. ३०/०९/२०२० रोजी बेवनूर – जुनोनी रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे अपघात झालेला असून तेही गंभीर जखमी झालेले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेले आहे. त्यांना टाके पडलेले आहेत. तरी या बेकायदेशीर गतिरोधकामुळे व डी. बी. एल. कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झालेला असून त्यास विनापरवाना गतिरोधक घालणारे, गतिरोधकास परवानगी देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच डी. बी. एल. कंपनी जबाबदार आहेत. त्या दोन्हीही व्यक्तींची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्याकडे उपचारासाठी संबंधित प्रशासकीय अधिकारी व प्रशासन तसेच डी. बी. एल. कंपनी यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी व रस्त्यावर असलेले बेकायदेशीर गतिरोधक तात्काळ काढून भविष्यात होणारे अपघात टाळावेत अन्यथा संभाजी ब्रिगेड व बेवनूर – जुनोनी ग्रामस्थ यांच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश नाईक, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुधिर नाईक, जिल्हाअध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिन जगताप, सोमनाथ राऊत,संदिप नाईक यांच्या स्वाक्षरी आहेत.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन