खानापूरचे जाणते नेते माजी आमदार संपतराव(नाना) माने

“अहो सांगा श्रीपती,सत्ताविसातून नऊ गेले तर राहिले किती?” असे प्रश्‍न मांडणारे महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कवी ग.दि.माडगूळकर म्हणतात,२७ नक्षत्रातून पावसाची ९ नक्षत्रे कोरडी जाणारा हा ओसाड माळरानाचा इथला प्रदेश आहे.मात्र येथील हा दुष्काळ इथली काढता इथले निरिच्छ जीवन बदलण्याचा खरा प्रयत्न माजी आमदार कै.संपतराव (नाना) माने यांनी केला. कधीतरी वर्षातून वाहणारी अग्रणी गंगेबरोबरच जीवनाला आकार देणारी,चांगला विचार करायला लावणारी ज्ञानगंगा आणण्याचे भगीरथ काम त्यांनी केले.

कै.मा.संपतराव (नाना) माने शरीरयष्टीने उंच होते. त्याप्रमाणेच त्यांची विचारांची मुल्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावदादा पाटील यांच्याप्रमाणेच प्रगल्भ आणि उदात्त होती. या भागातील जनतेच्या विकासासाठी ते धडपडत होते.इथला दुष्काळ कायमचा नाहीसा व्हावा, इथल्या माणसांना पोटापाण्यासाठी कृष्णाकाठी ऊसतोड करायला जायला लागू नये, या भागाचा कायापालट व्हावा ही मनोमन नानांची इच्छा होती. यासाठी ते तळमळीने काम करीत होते.या माळरानावरील, दऱ्याखोऱ्यातील, घाटमाथ्यावर राहणाऱ्या शेतीत राबणाऱ्या जनतेसाठी काहीतरी करावे, त्यांच्या जीवनाला एक प्रकारची प्रकाशमय वाट दिसावी, यासाठी ते प्रयत्न करीत होते.
या भागाचा कायापालट व्हायचा असेल तर येथील माणसांना शिक्षण मिळाले पाहिजे, माणूस शिकला पाहिजे,माणसं शिकली की त्यांची वैचारिकता बदलते, माणसाचा जगण्याकडे, समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन पारदर्शी बनतो.अशा चांगल्या विचारांच्या बैठकीत त्यांची जडणघडण झाली.
सामान्य गोरगरीब घरातील मुला-मुलींना शिक्षण घ्यायचे असेल तर त्याकाळात विटा, सांगली नाहीतर कराडला जावे लागत होते.त्यामुळे तालुक्यातील सामान्य गोरगरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत होती.दूरच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची परिस्थिती सामान्य गोरगरिबांच्या घरातील मुलांची नव्हती. त्यामुळे शिक्षणाची आस असणारी मुले-मुली शिक्षणापासून दूर राहू लागली. शिक्षणाच्या अभावामुळेच तालुक्याचा विकास घडणार हे ओळखून आणि ज्ञानाची ज्ञानगंगा बारमाही वाहती रहावी या ज्ञानगंगा येथील श्रीमंतापासून ते तालुक्यातील सर्वसामान्यापर्यंत सर्वजण डुंबून जावेत, हा ध्यास घेऊन संपतरावनानांनी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून देवी सरस्वतीची सेवा करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावदादा पाटील यांच्याप्रमाणेच नाना दृष्टे होते.त्यांच्या अंगावरील पेहरावात एक प्रकारचा खानदानीपणा होता. पारदर्शकता,शालीनता या सर्व गोष्टींचा मिलाफ मृदुभाषी स्वभावात पहायला मिळायचा.वसंतरावदादा पाटील यांच्याप्रमाणेच संपतरावनाना यांनी एक ठरवले असावे की शिक्षण आणि देशाच्या राजकारणात मोठी झालेली उत्तुंग किर्तीची माणसे समाजासमोर आणावीत आणि ती आणण्याचा आटोकाट प्रयत्न केले.
भारताच्या माजी पंतप्रधान कै. श्रीमती इंदिरा गांधी व भारताला संगणकाच्या एकविसाव्या शतकात नेणारे पंतप्रधान राजीव गांधी यांची मैत्री सर्वांना ज्ञातच होती. या सर्व मोठ्या दिग्गज मंडळींचा यथोचित सन्मान नानांनी केला.
शिक्षणातून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी खानापूर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. परिसरातील शैक्षणिक व सामाजिक क्रांतीचे स्वप्न साकार केले.आज या शिक्षण प्रसारक मंडळाचे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालय, खानापूर तालुक्याच्या पूर्वीपासून ते पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत वाचनालय, वस्तीगृह कार्यरत आहेत. या शैक्षणिक प्रगतीच्या माध्यमातून जिल्ह्यात आपल्या शैक्षणिक कार्याचा ठसा उमटवला आहे.ज्ञानरूपी गंगेचा वेगळा प्रकाश सर्वांना दाखवून डोळे दिपवण्याचे काम ही संस्था करीत आहे.
संपतरावनाना माने हे सामाजिक कार्यात कायमच अग्रेसर राहिले.त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे व चिकाटीमुळे सामाजिक कार्याची विकासगंगा वाहती ठेवली.खानापूर एस.टी.डेपो,स्टॅन्ड अशा विविध सुधारणा होताना त्यांचा सिंहाचा वाटा होता.सांगली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.पण यात त्यांनी अनेकांना खासदार,आमदार,मंत्रीही केले.
संपतरावनाना मनाने मोठे होते.त्यांना पद,खुर्ची नको होती.त्यांना फक्त जनतेच्या अडचणी सोडवण्यात रस होता.त्यांचा निस्वार्थीपणा यात दिसून येत होता. त्यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदाची कारकीर्द म्हणजे खानापूर तालुक्याच्या सुधारणाच्या युगाची सुरुवात होते.
दुष्काळावर मात करण्यासाठी पाझर तलावांची निर्मिती करण्यामध्ये ते अग्रेसर राहिले.दवाखाने,समाज मंदिरे उभारण्याची दिव्य कामे त्यांनी केली आहेत. थकणे,थांबणे या गोष्टी त्यांना कधीच मान्य नव्हत्या. त्यांची राजकीय कार्याची सुरुवात अनेक तरुण कार्यकर्त्यांना बरोबर घेऊनच झाली.संघटितपणे काम करण्याचे ध्येय असल्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदरयुक्त भाव सर्वांच्याच मनात होता. नाना हे सामाजिक कार्यात असल्यामुळे माणसांचा राबता त्यांच्या वाड्यात सतत असायचा. ते स्वतःचे जेवन घेऊन जात व सर्वसामान्यांच्या समस्या विटा येथे येऊन जाऊन सोडवत असत.नाना चार वेळा आमदार झाले.1972 पासून अखेरपर्यंत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले.अनेक सहकारी सूतगिरण्यांचे अध्यक्षपद भूषवले.
 सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात नाना यांनी आपली राजकीय वाटचाल सहकारातून पुढे धावती ठेवली. खानापूर तालुक्याच्या विकासासाठी सलग दहा वर्षे अथक परिश्रम घेऊन रात्रीचा दिवस करून नागेवाडी येथील माळरानावर यशवंत सहकारी साखर कारखाना उभा केला, कर्जमुक्त केला, जनता जनार्दनाच्या हाती बहाल केला. असा महान कर्तुत्ववान नेता 1 ऑक्टोबर 1990 रोजी अनंतात विलीन झाला.त्यांच्या अजोड कार्यास व त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! शतश: कोटी कोटी प्रणाम!
आज नानांच्या कार्यकर्तृत्वाची प्रेरणा घेऊन त्यांच्या अनेक संस्था अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांचे चिरंजीव श्री राजकुमार माने अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यांचे नातू विराज भैया माने या संस्थांवर सचिव म्हणून समर्थपणे काम पहात आहेत. म्हणून या सर्व संस्थांबद्दल संत ज्ञानदेवांच्या भाषेत सांगायचे झाले तर म्हणावे लागेल,

इवलेसे रोप लावियेले द्वारी, 
तयाचा वेलू गेला गगनावरी,
मोगरा फुलला 
मोगरा फुलला

प्रा.हेमंत अनंतराव कुलकर्णी,
श्री.संपतराव माने महाविद्यालय,खानापूर