करजगी येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याची मागणी; प्रांत,तहसिलदारांना निवेदन

अनिल मदने 
जत/ प्रतिनिधी:

करजगी येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानचे लायसन्स रद्द होऊन दुकानदार अशोक रेवणसिध्द जेऊर यांचेवर कारवाई करण्याबाबतचे निवेदन बहुजन समाज पार्टी,जत विधानसभा व अखिल भारतीय संत रविदास परिषद यांच्या वतीने तहसिलदार व प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,करजगी येथील सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान अशोक रेवणसिध्द जेऊर हे चालवित असून या रेशन दुकानामध्ये गावातील मागासवर्गीय व इतर समाजातील लोक रेशन आणणेसाठी गेलेनंतर  दुकानदार धान्याचे वाटप नियमानुसार न करता तसेच अडाणी लोकांचा गैरफायदा घेऊन कमी माल देतात.धान्य कमी का दिले? याचा जाब विचारल्यास महिला व जेष्ठ नागरिकांना एकेरी भाषेत व उध्दटपणे बोलतात.
तसेच शिवीगाळ व दमदाटी करतात व माझेविरुध्द कोठेही तक्रार करा असे बोलतात. पुढच्या महिन्यापासून दुसऱ्या गावातील रेशन दुकानातून धान्य् घेऊन जाणेस सांगतात.तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ, डाळी या व्यक्तीरिक्त इतर लोकल मार्केटमधील चहापूड, खाद्यतेल, खोबरेल तेल, कपड्याचे साबण, अंगाला लावयचा साबण, कपडे धुण्याचे पावडर व अन्य वस्तू सक्तीने विकत घ्यायला लावतात. त्याशिवाय स्वस्त धान्य दुकानातील माल मिळत नाही.  या वस्तू बाजार भावापेक्षा जास्त दराने लोकांना विक्री करतात.
कोविड 19 काळामधील शासनाकडून मिळणारे मोफत धान्य वाटप नियमानुसार झालेले नसून याची सखोल चौकशी करावी. संबंधित करजगी या गावातील अन्यायग्रस्त मागासवर्गीय व इतर समाजातील लोकांनी दि. 16/09/2020 रोजी लेखी तक्रार दिली आहे. संबंधित विभागाच्या निरीक्षकांनी या दुकानाचा पंचनामा व गावातील 56 लोकांचे जबाब नोंदविलेले असून अद्यापही त्यांचेवर कारवाई झालेली नाही. या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानचे लायसन्स रद्द होऊन दुकानदारावर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.
बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव जकाप्पा सर्जे, प्रभारी महादेव कांबळे, बामसेफ संयोजक महेश शिंदे, प्रभारी गौतम सर्जे, शहर अध्यक्ष सुनिल क्यातन व अखिल भारतीय संत रविदास परिषद पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण शिंदे, जत तालुका अध्यक्ष अरुण साळे व करजगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.