
शुक्रवारचा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरू करण्याची मागणी!
अनिल मदने
जत/ प्रतिनिधी:
महाराष्ट्रासह शेजारच्या पाच-सहा राज्यात सुप्रसिद्ध असलेला व कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारा माडग्याळचा शुक्रवारचा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार सुरू करण्याची जनतेतून मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील माडग्याळ येथील शेळी-मेंढीचा शुक्रवारचा आठवडा बाजार सुप्रसिद्ध आहे. येथे माडग्याळी जातीची नामवंत देखणी मेंढी आणि मांस विक्रीसाठी लागणारे बोकड खरीदीसाठी मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथील व्यापारी बाजारावर तुटून पडतात. दर आठवड्याला खरेदी-विक्रीतून जवळपास 4 ते 5 कोटी रुपयांची उलाढाल होते.
परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली 7 महिन्यापासून आठवडा बाजार बंद झाला आहे. तो योग्य नियोजन करून सुरु करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
सहज सुलभ बाजारपेठेमुळे या भागात मोठ्या प्रमाणात शेळी-मेंढीचे पालन केले जाते. अनेकांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो.
येथील बोकडाच्या मटणाला दुसऱ्या राज्यातील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने चांगला दर मिळत असतो. पण कोरोनामुळे बाजार बंद असल्याने शेळी व मेंढींची विक्री झालेली नाही. काही व्यापारी घरोघरी फिरून बोकडे खरेदी करतात. पण हे व्यापारी पशुपालकांकडून दर पाडून कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. ६ ते ७ हजारचे किमतीचे बोकड ३ ते ४ हजार रूपये दराने विकत घेत आहेत.त्यामुळे पशुपालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
या परिसरातील अनेकांची आठवड्याची रोजी-रोटी माडग्याळ बाजारावर अवलंबून आहे.पण बाजारच बंद झाल्याने आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शेळी मेंढीची विक्री करण्यासाठी व्यापारीच नसल्यामुळे मोठे नुकसान होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा भरपूर आहे. सोशल डिस्टंसिंगचे योग्य नियोजन करून बाजार चालु करण्यात यावी अशी मागणी या भागातील पशुपालक करीत आहेत.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन