सुभाष मोरे/लोणार (बुलढाणा):
महावितरणच्या गलथान कारभाराने कळस गाठल्याचा प्रकार घडला.शेतात विज जोडणी नसतानाही अल्पभूधारक शेतकर्यांना ४८ हजाराचे वीजबील दिले. महावितरणच्या या प्रतापाने शेतक-यांचा मनस्ताप वाढला असून याबाबत केलेल्या अर्ज विनंत्याकडे अधिका-यांकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये असलेल्या वडगाव माळी या गावातील अल्पभूधारक शेतकरी भुजंगराव आश्रुजी पाटोळे यांच्याकडे पांग्री काटे शिवरात अडीच एकर जमीन आहे. त्यामध्ये त्यांनी शासकीय योजनेमधून विहिर घेतली आहे. त्यावर विद्युत जोडणीसाठी त्यांनी महावितरणच्या मेहकर येथील सबडिव्हीजनला २०१४ ला कोटेशनचा भरणा केला.विद्युत जोडणी त्वरित करण्यात यावी, यासाठी त्यांनी वारंवार मेहकर येथील महावितरण कार्यालयात चकरा मारल्या. परंतु कामचुकार अधिका-याकडून पदरी निराशाच आली.नंतर त्यांनी मार्च २०२० ला कार्यकारी अभियंता महावितरण खामगाव ,अधिक्षक अभियंता, बुलडाणा यांच्याकडे व जून २०२०ला ऊर्जामंत्री यांच्याकडे सुध्दा तक्रार दिली. परंतु निराशेशिवाय पदरी काहीच आले नाही. शेतात विहीर व विहिरीला भरपूर पाणी असुनसुध्दा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शेतक-यांचे हिरवे स्वप्न भंगल्याने,सहा वर्षांचे हातचे पिक गेल्याने त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत आहे. निसर्गाची अवकृपा, कवडीमोल भावाने शेतमालाची विक्री, शेतक-यांप्रती शासन प्रशासन यांची उदासिनता हे शेतक-याच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे, हे नाकारून चालणार नाही.


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक