
आटपाडी/ प्रतिनिधी:
दिघंची-हेरवाड राज्य मार्ग क्र.१५३ ,जवळपास सव्वा चारशे कोटी रु.चा हायब्रीड ऑन्यूईटी प्रकल्प अनेक संसार उघड्यावर पाडत पुढे जात आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी घरे निर्दयीपणे तोडली जात आहेत. विशेषतः कोरोनाने पिचलेल्या या कुटुंबांना कोणतीही शासकीय मदत वा पुनर्वसन केले जात नाही.अशा दुहेरी संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व अखिल भारतीय किसान सभा पुढे सरसावली आहे.
१९७२च्या दुष्काळापूर्वी शेटफळे -आटपाडी हा बैलगाडी रस्ता होता. दुष्काळ पडला तेव्हा याच रस्त्यांवर गावांतील लोकांनी खोरं-पाटीने या रस्त्यावर कामे केली.आज त्याच गावातल्या त्याच रस्त्यावर काम करणाऱ्याचे राहते छप्पर या रस्त्याने हिरावून घेतले आहे.
इतर ग्रामीण मार्गाचा जिल्हा मार्ग झाला,पुढे जिल्हा मार्गाचा राज्यमार्ग झाला. याचा गावकऱ्यांना आनंद आहे.गावाची प्रगती होईल,व्यापार दळणवळण वाढेल, तरुणांच्या हाताला काम मिळेल.परंतु दुसऱ्या बाजूला ज्यांची घरे गेली,त्यांचा संसार उघड्यावर आला.
एक घर उभं करायला हयात जाते.पै-पै साठवून घर उभं केलेलं असतं.या लोकांना किमान पुनर्वसन किंवा मदत शासनाने करायला हवी. त्यासाठी एकजूट घडवून संघटितपणे संघर्षही व्हायला हवा.आपली घरे जरी सुरक्षित असली तरी जी कुटुंबे बाधित झालीत त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. कारण कोरोना टाळेबंदीने सगळं हिरावून घेतलंय!
यावेळी स्वाभिमानी तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड,भारत माने,प्रदिप क्षिरसागर,शशिकांत गायकवाड,बापूराव गायकवाड उपस्थित होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद