
अनिल मदने
जत/ प्रतिनिधी :
जत तालुक्यातील जनतेने कोरोनासारख्या महामारीला हलक्यात घेऊ नये.सद्य परिस्थितीत सांगली जिल्ह्यासह जत तालुक्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने जनतेने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबरोबरच सॅनिटराइजचा वापर करावा व तोंडाला मास्क लावावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय कांबळे यांनी केले आहे.
कांबळे यांनी म्हटले आहे की,जत तालुक्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ही चारशेच्या जवळपास चालली आहे.तर दररोज मृत्यु पावणारेंची संख्याही वाढत आहे.तालुका प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग त्याचप्रमाणे जत नगरपरिषद यांनी आता कोरोना संदर्भात गांभीर्यपूर्वक पहावे.
जत शहरात प्रमुख बाजारपेठेत तसेच शहरातील वित्तीय संस्था,भाजी मंडई,मटन विक्रेते यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नाही.तसेच तोंडाला मास्कही लावत नाहीत. ही चिंताजनक बाब आहे.
जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत, रस्त्यावर वाहतूकीची कोंडी करणारे,दुचाकी वाहनावरून तीघेजण फिरणारे वाहनचालक तसेच दुकानासमोर गर्दी करणारे ग्राहक यांना पोलिसांनी शिस्त लावावी.
जत नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी हे ज्या ठिकाणी कोरोनाचा पाॅझिटीव्ह रूग्ण सापडला आहे, त्याठिकाणी पत्रे व बाबळीचे काटे टाकून मर्यादित स्वरूपात कंटेन्टमेंट झोन करीत असले तरी या कंटेन्टमेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती येत जात असताना दिसतात. तसेच कंटेन्टमेंट झोनमधील व्यक्ती ही कंटेन्टमेंट झोनबाहेर फिरताना दिसत आहेत. या बाबींना अटकाव घालावा.
जतमधील शासकीय कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तर जत्रेसारखी गर्दी पहावयास मिळत असून या गर्दीमुळे कोरोनाला आपणहून आमंत्रण दिल्यासारखे होणार आहे.
सद्या सांगली जिल्ह्यात दररोज चारशेच्यावर कोरोना पाॅझीटीव्ह रूग्ण आढळून येत आहेत. सांगली व मिरज येथील सर्वच शासकीय व खाजगी हाॅस्पीटल ही कोरोनाबाधित रूग्णांमुळे फुल्ल झाली आहेत. त्याठिकाणी नवीन रूग्ण दाखल करून घेण्यासाठी पुरेसे बेडस उपलब्ध होऊ शकत नाहीत. शासकीय हाॅस्पीटल व धर्मादाय हाॅस्पीटल सोडली तर इतर खासगी हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी लाखो रूपये मोजावे लागत आहेत. उपचारासाठी घेऊन गेलेला आपला माणूस परत येईल का नाही याची खात्री देता येत नाही.
कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डाॅ. विश्र्वजित कदम,जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जत येथील कोरोनाबाधित रूग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन ग्रामीण रूग्णालयात चार व्हेंटीलेटरची व्यवस्था करावी व यासाठी जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा,असे आवाहनही कांबळे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन