
आटपाडीसह ९ गावांची आटपाडी नगरपालीकाच करा
आटपाडी नगरपंचायत हद्दीतला ” पथदिव्यांचा ” प्रश्न सोडवा .
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडीसह ९ गावांची आटपाडी नगरपालीकाच करा . आटपाडी शहराच्या चौफेर व सर्वांगीण विकासासाठी १०० कोटी रुपयाचे गिफ्ट अनुदान द्या आणि आटपाडी नगरपंचायत हद्दीतील अतिशय महत्वाचा आणि ऐरणीवरचा बनलेला पथदिव्यांचा प्रश्न दिवाळी पुर्वी तातडीने सोडवा . असे आवाहन आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे .
इतर नगरपालीकांच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या आटपाडी नगरपंचायतीकडील महावितरणच्या थकबाकीमुळे महावितरणकडून नगरपंचायतीची अडवणूक केली जात आहे . आटपाडी नगरपंचायतीने अत्यावश्यक ठिकाणचे पथदिव्यांसाठीचे खांब आणि तारा बसविण्यासंदर्भातले महावितरणकडे पाठविलेले प्रस्ताव थकबाकीचे कारण दाखवून महावितरणने अडविले आहेत .
आटपाडी नगरपंचायत हद्दीतला सर्वात महत्वाचा बनलेला पथदिव्यांचा प्रश्न तातडीने सोडवला जावा म्हणून आटपाडी शहरातील अनेकांनी सातत्याने आवाज उठविला आहे . टेंभूचे पाणी आटपाडी तालुक्यातील जवळ जवळ सर्व गावात आल्याने कृष्णेच्या आणि नदी काठच्या परिसरातील नानाविध विषारी साप या पाण्यातून आटपाडी तालुक्यात सर्वत्र आले आहेत. आटपाडी शहर व परिसरात पूर्वी कधीही आढळून न आलेले वेगवेगळ्या जातीचे भयानक विषारी साप वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. आटपाडीचा मोठा तलाव, लगतचे डबईचे प्रचंड कुरण आणि तेथूनच आटपाडीकडे झेपावणारे, वळसा घालणारे दोन ओढ्यांमुळे या विषारी सापांची वर्दळ वाढली आहे . हे वास्तव लक्षात घेता पथदिव्यांची अनिवार्य अशी अति अत्यावश्यकता आहे . हे लक्षात येईल .
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्ह्यातील खासदार, आमदार यांचे प्रसार माध्यमे, प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले आहे .
आटपाडी नगरपंचायत हद्दीत १४३० पथदिव्यांचे खांब आहेत . या पथदिव्यांच्या खांबावरील बऱ्याच ठिकाणचे पथदिवे बंद अवस्थेत आहेत . आणखी बऱ्याच ठिकाणी पथदिव्यांसाठीचे खांब उभे करणे, त्यावर तारा ओढणे गरजेचे आहे . आटपाडी नगरपंचायतीने गोंदीरा परिसरातल्या पाटील वस्ती, सोलनकर वस्ती, गावडे वस्ती, मायाक्का नगर, सोमेश्वर नगर इत्यादी ठिकाणी पथदिव्यांसाठीचे खांब, तारा बसविणेसाठीच्या अंदाजपत्रका संदर्भातील प्रस्ताव महावितरण कडे दाखल केले होते .
नगरपंचायत आटपाडी यांच्याकडील पथदिवे थकबाकी २ लाख १४ हजार ९०४ रुपये, आणि पुर्वीच्या आटपाडी ग्रामपंचायत काळातील पथदिव्यांची थकबाकी १ कोटी २ लाख ३६ हजार ४६७ रुपये अशी १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत आटपाडी नगरपंचायतीकडे एकूण थकबाकी १ कोटी ४ लाख ५१ हजार ३७१ रुपये इतकी आहे . पथदिव्यांची सर्व थकबाकी भरल्याशिवाय आटपाडी नगरपंचायतीच्या पथदिव्यांसाठी वाढीव अथवा नवीन वीज जोडणी देता येणार नाही . नगरपंचायतीने थकबाकी भरल्याची रिसीट महावितरणकडे दिल्यानंतरच नगरपंचायतीच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात येईल . असे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या . उपविभागीय कार्यालय आटपाडीचे उपकार्यकारी अभियंता यांनी दि . १९ । ९ । २०२५ ला आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकाऱ्यांना कळविले आहे . महावितरणने आटपाडी नगरपंचायतीकडील तपशीलवार थकबाकी कळविलेनंतर ती थकबाकी भरण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांनी महावितरणला कळविल्याचे दुरध्वनीवरून आपल्याशी बोलताना सांगीतल्याचे सादिक खाटीक यांनी निर्दशनास आणले .
सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालीका, सर्वात मोठे कार्यक्षेत्राची महानगरपालीका आहे . जिल्ह्यातील नगरपालीका, नगरपंचायती मध्ये पहिली लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात न आलेली आटपाडी नगरपंचायत ही कार्यक्षेत्राच्या बाबतीत जिल्ह्यात एक नंबर असल्याचे जिल्हा बॅकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी नुकतेच सांगीतले होते . कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती .
सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालीकेला पूर्वी राज्य शासनाने १०० गिफ्ट अनुदान दिले होते . सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आणि माणदेशी ८ तालुक्याचे मुख्यालय शोभणाऱ्या, आटपाडी तालुक्यातील जिल्ह्यात सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या आटपाडी नगरपंचायतीच्या सर्वांगीण आणि चौफेर विकासासाठी राज्य शासनाने १०० कोटी रुपयाचे गिफ्ट अनुदान देवून या नगरपंचायतीचा गौरव करावा .अशीही मागणी सादिक खाटीक यांनी केली आहे .
माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री ना . एकनाथराव शिंदे यांनीच ५ वर्षापूर्वी आटपाडी नगरपंचायत निर्मितीची घोषणा केली होती . त्यांचे खंदे समर्थक दिवंगत आमदार अनिलराव बाबर यांचे निष्ठावान अनुयायी आणि विद्यमान आमदार सुहास बाबर यांचे मार्गदर्शक सहकारी असलेल्या तानाजीराव पाटील यांनी आमदार सुहास बाबर यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडून आटपाडी नगरपंचायती साठी १०० कोटी रुपयांचे खास गिफ्ट अनुदान आणावे . आणि आटपाडी नगरपंचायतीमध्ये पूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचा भाग असणाऱ्या, पुजारवाडी, देशमुखवाडी, यप्पावाडी, खांजोडवाडी, मासाळवाडी, मुढेवाडी, भिंगेवाडी, मापटेमळा या लगतच्या ८ गावांचा समावेश करून, पहिली लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात येण्यापूर्वीच आटपाडी नगरपालीकाच अस्तित्वात आणून २५ वर्षातील सर्वात महत्वाचे गिफ्ट समस्त आटपाडी शहर वाशीयांना द्यावे . असेही आवाहन सादिक खाटीक यांनी केले आहे .

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती