
75 वर्षीय वृद्धेची निर्घृण हत्या – डोक्यावर जबर मारहाण करून ठार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
माण तालुक्यातील रानंद गावच्या हद्दीत असलेल्या हेळकर पठारावर 75 वर्षीय हिराबाई दाजीराम मोटे यांचा अज्ञातांनी खून केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वृद्ध महिला घराबाहेर रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
घटना अशी उघडकीस आली :
9 सप्टेंबरच्या रात्री आठच्या सुमारास मृताच्या भावजयी भिवराबाई ही दोन अनोळखी लोकांना घेऊन घरी आल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी हिराबाई अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर सकाळी 9 वाजता, शेजारील हेळकर पठारावर त्यांचा मृतदेह पडलेला आढळून आला. डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखमा होत्या व त्या जागीच ठार झाल्या होत्या.
घरातील सामानाची उचकापाचक :
घरात परतल्यावर संसारातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. अज्ञात इसमांनी घरात घुसून नासधूस केल्याचे स्पष्ट होत होते. पोलिसांना शंका आहे की चोरीचा हेतू की कौटुंबिक वाद यावरून खून झाला असावा.
पोलीसांचा तपास :
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या हाती देण्यात आली असून, अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परिसरात भीतीचे सावट :
शांत गावात घडलेल्या या खुनामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वृद्ध महिलेच्या खुनामागचे कारण काय? आरोपी कोण? या प्रश्नांनी गावकऱ्यांच्या चर्चेला उधाण आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती