“सामाजिक बांधिलकीचा आदर्श” — RN’s कॅफे व विद्यार्थी हक्क कृती समितीचा विशेष उपक्रम

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
विटा

“एक हात मदतीचा, एक पाऊल माणुसकीकडे” या भावनेतून RN’s कॅफे विटा आणि विद्यार्थी हक्क कृती समिती, सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. अजितराव सूर्यवंशी विशेष निवासी विद्यालय, विटा येथे विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले.

या प्रसंगी विद्यार्थी हक्क कृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष मा. समर्थ शिंदे–सरकार, जिल्हा सहकार्याध्यक्ष मा. जयंत दादा लाड, RN’s कॅफेचे सर्वेसर्वा मा. रोहन नाईक नवरे, सोशल मीडिया प्रमुख मा. यश विभुते आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले.

शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या विविध अडचणींना सामोरे जाणाऱ्या या विशेष विद्यार्थ्यांसोबत स्नेहबंध जुळवत, प्रेम आणि आपुलकीचा अनुभव या कार्यक्रमात पाहायला मिळाला. अशा उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मकतेचा संदेश जात असून, युवकांनीही सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावा, असा संदेश या माध्यमातून दिला गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी RN’s कॅफे आणि विद्यार्थी हक्क कृती समितीचे योगदान मोलाचे ठरले. भविष्यातही असे उपक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.