विधानभवन परिसर म्हणजे राजकीय पुढाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे तमाशा केंद्र आहे का?

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

नागपूर /लेख
राज्याचे विधानभवन म्हणजे कायदेमंडळाचे मंदिर व लोकप्रतिनिधीचे भवन या ठिकाणी राज्याच्या विकासाचे, गुन्हेगारांवर लगाम कसण्याचा निर्णय घेणे,मुलभूत प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचा प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, महागाई इत्यादी अनेक महत्वपुर्ण बाबींवर चर्चा करण्याचे व निर्णय घेण्याचे ठिकाण म्हणजे संविधानाने बनवून दिलेले विधानभवन.अशा विधानभवन परिसरात जर राजकीय पुढाऱ्यांचे कार्यकर्ते किंवा राजकीय पुढारी गुंडागर्दी करीत असेल अशा विधानभवनाला किंवा त्या परिसराला काय नाव द्यावे हा मोठा प्रश्न राज्यासमोर व राज्याच्या १४ कोटी जनतेसमोर उपस्थित होतो.

राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या आत्महत्ये संदर्भात, महागाईच्या संदर्भात किंवा मुलभूत सुविधांच्या संदर्भात राजकीय पुढारी हातापायी करणार नाहीत किंवा आत्महत्याही करणार नाही.परंतु राजकीय वर्चस्वासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय पुढारी व त्यांचे कार्यकर्ते हातापायी करतात व संविधान स्थळाला मलीन करण्याचे काम करतात हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.अशा अनेक घटना पुर्वी सुध्दा झाल्यात.काही दिवस अगोदर आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनाच्या कॅन्टीन मालकाला मारहाण केली त्याचे काय झाले काहीच नाही आणि काही होणार सुध्दा नाही.

दिनांक १७ जुलै २०२५ ला विधानभवन परिसरात गोपीचंद पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली, घाणेरड्या भाषेत शिवीगाळ झाली,कायदेमंडळाच्या मंदिराला काळा डाग लावला ही बातमी मिडिया व वर्तमानपत्राच्या माध्यमातून राज्यासह संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात हवेसारखी पसरली यामुळे राज्याची बदनामी सुध्दा झाली याचे दुःख राज्याच्या जनतेला आहे परंतु बेशरम राजकीय पुढाऱ्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तर बिलकुलच नाही ही शोकांतिका आहे.

या घृणास्पद घटनेचा राजकीय पुढाऱ्यांवर किंवा त्याच्या कार्यकर्त्यांवर काहीच परिणाम होणार नाही. कारण या संपूर्ण लोकांनी बेशरमीची संपूर्ण हद पार केली आहेत. सध्याच्या परिस्थितीत राजकीय पुढाऱ्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसराला गुंडांचा आखाडा बनविल्याचे स्पष्ट दिसून आले.कारण अशा लज्जास्पद घटना एकावर होतच आहे.परंतु सरकार कारवाईचे फक्त आश्वासन देऊन अशा घटनांवर पांघरूण घालण्याचे काम करीत आहेत. परंतु या गुंडगिरीवर ठोस अशी कोणतीही कारवाई होत नाही ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.

अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेत मोठी ठेच पोचते व अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मुख्यत्वेकरून राजकीय पुढाऱ्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी थोडीशी तरी लाज शरम ठेवली पाहिजे. विधिमंडळाच्या परिसरात जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे.त्यामुळे जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर किंवा संजय गायकवाड यांच्यावर कारवाई अशी करावी की भविष्यात कोणताही आमदार असे घृणास्पद कृत्य करणार नाही.यासाठी एकच सजा आहे ती त्यांना संविधानिक पदावरून हटविणे व विधानभवन परिसरात हाणामारी करणाऱ्यां दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना आजीवन कारावास व्हायला पाहिजे.

कारण त्यांनी न्यायपालिकेची व संविधानाची पायमल्ली केली आहे.अशाप्रकारे योग्य कारवाई होत असेल तरच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील आणि संविधानिक परिसरात अशा लज्जास्पद घटनांवर आळा बसेल.कारण राजकीय पुढाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कुस्त्या खेळायच्या असेल व एकामेकांच्या छातीवर बसायचे असेल तर हे कृत्य बाहेर कुठेही करता येते तेथे करावे.कारण विधानभवन परिसरात म्हणजे कोणाच्या बापाची जागीर नसुन ते संविधानिक, कायदेमंदीर व अती संवेदनशील क्षेत्र आहे.

याची जाणीव आजी-माजी आमदार, मंत्री व कार्यकर्ते यांनी लक्षात ठेवले पाहिजे.राजकिय पुढाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एवढी मुभा दिली आहे की सर्वच पक्षांचे आमदार आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन विधिमंडळात येतात.बऱ्याचदा आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे पासही नसतात.परवाना नसतांना ते अनेक ठिकाणी फिरत असतात.विधिमंडळात त्यांचा मुक्त संचार असतो.

आमदारांच्या कार्यकर्त्यांचे विधिमंडळात फोटोसेशन चालते.म्हणजे जणुकाय पीकणीकला आले की काय अशी परिस्थिती कार्यकर्त्यांची असते.या संपूर्ण घटनेची दखल घेऊन सरकारने व गृहमंत्रालयाने ताबडतोब अशा घृणास्पद कृत्यावर लगाम कसली पाहिजे अन्यथा अशा घटनांचा फायदा असामाजिक तत्वांचे लोक घेऊ शकतात व अनर्थ होऊ शकतो यालाही नाकारता येत नाही.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
( स्वतंत्र पत्रकार )
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.