भाई शिवराम मासाळ
अध्यक्ष बळीराजा फौंडेशन
9922173284
राजे उमाजी नाईक (७ सप्टेंबर, १७९१ – ३ फेब्रुवारी, १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र लढ्यातील प्रथम सशत्र क्रांतीकारक मानले जातात.
आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक (खोमणे)उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, “लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. सर्व राजे रजवाडे , सरदार जमीनदार, वतनदार, देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी बंड पुकारावे आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. असे करणाऱ्यास नवीन सरकारमधून जहागिरी, इनामे वा रोख पैशाची बक्षीसे मिळतील.
ज्यांची वंशपरंपरागत वतने, तनखे, इ. इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन राज्याची स्थापना होइल. इंग्रजांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल” असे सांगून उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपूर्ण क्रांतिकारकांचा इतिहासात अशा प्रकारचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो.
हे भारताच्या इतिहासातील सोनेरी पानच आहे. म्हणूनच उमाजीराजे हे आध्यक्रांतिकारक ठरतात. तेंव्हापासून उमाजी हे जनतेचे राजे बनले. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीराजेंना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली. इंग्रजांनी उमाजीराजेंविरुद्ध ५वा जाहिरनामा प्रसिद्ध केला. माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये रोख आणि चारशे बिघे (200एकर) जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. हा इनाम त्या काळात अगणीत होता. त्र्यंबक चंद्रस कुलकर्णी हा फितूर झाला व याने उमाजींराजेंची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली. इंग्रजांनी दिलेली नापिकी जमीन त्यास मान्य नाही हे पत्राने कळविले आहे.(संदर्भ प्रल्हाद मलमे यांचा ग्रंथ)
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्यांना ३५ दिवस ठेवण्यात आले. अशा या खोलीत उमाजीराजे असताना त्यांना पकडणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन मॅकिन्टॉश दररोज महिनाभर त्यांची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीराजेंची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे.
उमाजीराजेंवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर राजे उमाजी यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिले नरवीर उमाजीराजे नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. जीवंतपणी सतत ताठ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीराजेंचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.
अशा या धाडसी उमाजीराजेंनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी उमाराजेंचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता. त्यांचा लढा वर्षानुवर्षे प्रेरणा देत राहील. आज क्रांतिकारक उमाजीराजे यांचे आनूयायी असणारा बहूतांशी रामोशी समाज पुर्णतः इतिहास विसरून कोणाच्यातरी सांगण्यावरून भरकटलेल्या दिसतोय,तो आज गावगाड्यात सत्तेपासून वंचित आहे,त्यास कारण रामोशी समाजाचे राजकीय, सामाजिक नेतृत्व योग्य दिशेने जातांना दिसत नाही, त्यामुळे श्रमाची कामे करावी लागत आहे,
हा समाज नेतृत्वाअभावी कोणाचा तरी अविचारी लोकांच्या नादाला दिशाहीन होताना दिसतोय, बहूसंख्य अल्पशिक्षित, किंवा शिक्षणचं नाही, बालविवाह,बैलगाडा शर्यती, कुत्र्यांच्या शर्यती आशात वेळ घालवताना दिसतात,त्याच बरोबर योग्य मार्गदर्शन नसल्यानें गावटग्यांच्या संगतीने व्यसनाधीन झालेला आहे ही आजची वास्तव परिस्थिती आहे.ह्यासाठी सामाजिक संस्था तसेच समाजातील सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेऊन पर्याय काढणे गरजेचे आहे…

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती