म्हसवडमधील खाजगी डॉक्टरच्या चुकीमुळे सहा वर्षाच्या बाळाचा मृत्यू

खडकी येथील मयत सम्यक बनसोडेच्या पालकांचा डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर आक्षेप
डॉक्टरांच्या चुकीमुळेच बाळाने जीव गमावल्याचा पालकांचा आरोप
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड

सहा वर्षांचा चिमुकला सम्यक दत्तात्रय बनसोडे (वय-६)रा.खडकी,ता.माण या गावात आपल्या घरातील सदस्यांसोबत गुण्यागोविंदानं राहत होता. बुधवारी रात्री त्याला जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला उपचारासाठी म्हसवडमधील व्होरा डॉक्टरच्या वर्धमान मॅटर्निटी अँड नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल केले गेले.

प्राथमिक उपचारानंतर सम्यकच्या वडिलांनी त्यास घरी नेले. सकाळी पुन्हा तोच अन् अधिकचा त्रास लहानग्या सम्यकला होऊ लागल्याने गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यास परत एकदा त्याच ठिकाणी उपचारार्थ दाखल केले.
उपचारादरम्यान डॉक्टरच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्या बाळास जुलाबाच्या साध्या आजारातदेखील आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा आरोप सम्यकच्या पालकांनी डिजीटल मिडियाच्या पत्रकारांशी बोलताना केलाय.

आजारी असतानादेखील आजी,आई वडील, अन् नातेवाईकांसोबत हसून खेळून गप्पा मारणारा सम्यक दवाखान्यात दाखल होईपर्यंत सम्यक चांगल्याप्रकारे बोलत, गप्पा मारत होता. डॉक्टरने केलेल्या चुकीच्या पद्धतीच्या उपचारामुळे आमच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केलाय.

हा प्रकार घडताच व्होरा डॉक्टरांनी हे प्रकरण उघडकीस येऊ नये, म्हणून बाळ मयत असतानादेखील त्याच्या नातवाईकांसह पुढील उपचाराचे कारण पुढे करून म्हसवड येथील लाईफलाईन आय.सी.यू. व मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यास सांगितल्याचेही सम्यकच्या पालकांनी सांगितलयं. त्या दवाखान्यात पोहचेपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. तिथे पोहचल्यावर पुढील उपचाराला सुरुवात करण्याआधीच सहा वर्षीय सम्यक बाळ मयत घोषित केला गेला,असे मयत बाळाचे पालक म्हणाले.

झाल्या प्रकारामुळे नातेवाईकांनी कठोर भूमिका घेत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी म्हसवड पोलीस ठाण्यात पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत सम्यकच्या मृत्यूची नोंद आकस्मित पद्धतीने करण्यात आली आहे.