

लिंगीवरेत सोमवारी शेतकऱ्यांचा विजयी मेळावा!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी
१२ गावच्या बंद पाईपलाईन पाणी योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यानंतर पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने लिंगीवरेत आज शेतकऱ्यांचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.शेतकरी बांधवांनी या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन माजी जि.प.सदस्य जनार्धन झिंबल यांच्यासह पाणी संघर्ष चळवळीच्या सर्व नेत्यांनी केले आहे.
श्रमिक मुक्ती दल व समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळ यांच्या वतीने डॉ.भारत पाटणकर,आनंदराव पाटील,जनार्धन झिंबल,हणमंतराव देशमुख,साहेबराव चवरे, सादिक खाटीक, मनोहर विभुते व इतर सर्व प्रमुख चळवळीचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील वंचित १२ गावातील बंद पाइपलाईनचे काम तातडीने होण्यासाठी निविदा काढाव्यात व कामाच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात,या मागणीसाठी दि. २५ फेब्रुवारी,२०२४ रोजी आंदोलनाचे नियोजन केले होते. याबाबतचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री तसेच आटपाडी तहसीलदार आणि अधिकारी यांना दिले होते.
या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने सर्व मागण्या पूर्ण करून कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. जलसंपदा विभागाने डॉ. भारत पाटणकर यांना लेखी पत्र देऊन मागणी मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करावे अशी विनंती केली होती. शासनाच्या लेखी पत्रामुळे आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. टेंभू योजनेच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यामुळे आटपाडी तालुक्यातील वंचित बारा गावातील शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे. वंचित १२ गावातील शेतकऱ्यांच्या वतीने पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांचे अभिनंदन करण्यात आले.
लिंगीवरे, राजेवाडी, पुजारवाडी (दि), पांढरेवाडी, उंबरगाव, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, बोंबेवाडी, वलवण, गुळेवाडी, विभूतवाडी, धावडवाडी या गावातील सुमारे ४ हजार १६ हेक्टर सिंचन क्षेत्राचा व ११ हजार २७ हेक्टर पीकक्षेत्राचा यामध्ये समावेश होणार आहे. यासाठी अंदाजित ५ हजार, ५२७ लक्ष रुपये खर्च येणार आहे.
पाणी संघर्ष चळवळीने हा निधी मंजूर करण्यासाठी दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात पाणी परिषद आयोजित करून रेटा लावलेला होता व आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पाणी परिषदेला हे यश मिळाले.
सोमवार दि.४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ४ वा. लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांचा विजयी मेळावा घेण्याचे नियोजन केले आहे.शेतकरी बांधवांनी या विजयी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी जि.प.सदस्य जनार्धन झिंबल यांच्यासह पाणी संघर्ष चळवळीच्या सर्व नेत्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती