स्वतःला सामर्थ्यशाली बनवा:प्रा.डॉ.विजय लोंढे

लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयात दहावी सदिच्छा समारंभ
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/लिंगीवरे
झोप उडवणारी स्वप्ने पहा, स्वतःला सामर्थ्यशाली बनवा, असे प्रतिपादन आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.विजय लोंढे यांनी लिंगीवर येथे केले.

लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदिच्छा समारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

विद्यालयातील सहशिक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व संतराम मदने यांनी स्वागत केले. लक्ष्मण खटके यांनी सूत्रसंचालन केले. रामराव खटके यांनी आभार मानले.
यावेळी यश सातपुते, वैष्णवी खटके,संगिता पुजारी, रचना लोखंडे, किशोर सूर्यवंशी, यशश्री कांबळे, सृष्टी अनुसे, शिवशंकर हेगडे, प्रणाली ढवळे, सोनाली मदने, वेदिका चांगण, समृद्धी सूर्यवंशी, प्रेरणा मदने सानिका ठोंबरे,अनिकेत तरसे, आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा.डॉ.विजय लोंढे बोलताना पुढे म्हणाले, शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडविणारे महत्त्वाचे किमयागार असतात. या देशात केवळ पुस्तकांसाठी घर बांधणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्या घराचं नाव आहे ‘राजगृह’. आपल्या वक्तृत्वातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना घडवणाऱ्या शिक्षकांचा प्रभाव असल्याचे स्पष्ट होत आहे. शब्दात मोठी ताकद असते.
शब्द पेटवतात देश, माणसे,अन् घरेदारेसुद्धा,
शब्दच विझवतात आगही पेटवलेल्या माणसांची.
तुमचे गुरु हे शब्दांचे जादूगार आहे. शिक्षकांनी तुम्हाला घडविताना आई-वडिलांच्या अधिकाराने संस्कार केलेत. कवी यशवंतांच्या पंक्तीप्रमाणे तुमचे गुरुजन प्रकाश देणारे आहेत.
आयुष्यात एक-एक पायरी चढत असताना आपली मान उंच होत जाते. दहावीनंतर पुढे प्रवासाच्या वाटा वेगवेगळ्या असतात. तुम्हाला शिक्षकांनी बांधून दिलेली ज्ञानाची शिदोरी ही सक्षम शिक्षकांनी दिलेली आहे.आई-वडिलांनी तुमच्याकडून अपेक्षा केल्या आहेत. तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी, कर्तुत्ववान व्हावे, काहीतरी करून दाखवावे.या प्रशालेतील संस्कार इतर प्रशालेपेक्षा निश्चितच वेगळे व चांगले आहेत.
पुढे त्यांनी आपल्या मनातील न्यूनगंड काढून टाकण्याचा सल्ला देऊन बडोदा संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा बालपणीचा किस्सा सांगितला.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे बदल होणार आहेत.आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य असावे, चिकाटी, नवीन गोष्टी आत्मसात करण्याची इच्छाशक्ती, प्रसंगाला कणखरपणे सामोरे जावे, अडचणींवर मात करावी. वाईटातून चांगले घडत असते. याबाबत बोलताना चार्ली चॅप्लिनच्या जडणघडणीचा किस्सा सांगून त्यांच्या चेहऱ्यावर कारुण्य आहे, पण त्यांनी जगाला हसवले.
पुढे जाताना पाठीवर सर्व शिक्षकांचा हात असतो. मुलींची संख्या इथे जास्त आहे. पूर्वी मातृसत्ताक पद्धती होती. परंतु शेतीची अवजारे आल्यानंतर ती अवजारे चालवणे महिलांना कठीण होऊन मातृसत्ताक पद्धती बंद झाली व पुरुषप्रधान पद्धती आली. आता पुन्हा महिला शिकत आहेत, कर्तुत्वान बनत आहेत, याचा आनंद आहे. केरळमध्ये मुली जन्माला आल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो.
आयुष्यात येणाऱ्या संकटांवर बोलताना मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेबांची दिल्लीतील भेट याबाबतचा किस्सा त्यांनी सांगितला.
शेवटी बोलताना ते म्हणाले, स्वतःला सामर्थ्यशाली बनवा, सर्व संकटावर मात करा. आयुष्यात अडचणी, समस्या आहेत, म्हणून आयुष्य जगण्यात आनंद आहे. या सर्वांवर मात करत पुढे जायचे आहे.पाहिलेली स्वप्ने,तुमची ध्येये प्राप्त होवोत, अशा शुभेच्छा देत एपीजे अब्दुल कलाम यांच्या
‘स्वप्न वो नही जो आप निद्रा मे देखते हो,
स्वप्न वो है जो आपको सोने नही देता|
या ओळींची आठवण करून देऊन ‘अशी स्वप्ने पहा की ती आपणाला झोपू देणार नाहीत. त्या स्वप्नांच्या पाठीमागे लागत असताना तुम्हाला तुमचे आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शन करणारे यांना विसरू नका. अडचण आल्यास नक्की त्यांच्याकडे परत जा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील’ असा सल्लाही शेवटी दिला व शुभेच्छा दिल्या.

जयकुमार शिरकांडे, भाऊसाहेब मंडले, ब्रह्मदेव खटके, रामदास जावीर, शहाजी खटके, हणमंत खटके आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांतर्फे विद्यालयासाठी स्पीकर बॉक्स भेट देण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपण ‘प्रगल्भनायक न्यूज’ वरुन करण्यात आले असून तो कार्यक्रम https://www.youtube.com/live/FdBOkTGqGHg?si=oo3xPEnIst-AQ4bk या लिंकवरून संपूर्ण कार्यक्रम पाहता येईल.