

लिंगीवरे येथे पाणी संघर्ष चळवळीच्यावतीने शेतकऱ्यांचा ‘विजयी मेळावा’ संपन्न
दिघंची/आटपाडी /प्रतिनिधी:
आटपाडी तालुक्यातील बारा गावांच्या बंद पाईपलाईन योजनेच्या कामाला व निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाल्यानंतर आमच्या देखरेखीखाली प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही, तर आंदोलनाचा चाबूक घेऊन उभे राहू, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व पाणी संघर्ष चळवळीचे नेते डॉ.भारत पाटणकर यांनी सरकारला दिला.
लिंगीवरे येथील श्री.धुळाजीराव झिंबल विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित आटपाडी तालुक्यातील बारा गावांच्या बंद पाईपलाईन योजनेच्या कामाच्या निविदा काढून काम सुरू करावे, यासाठी दिलेल्या आंदोलनाच्या इशारानंतर सरकारने निविदा प्रक्रियेला मंजुरी दिली व तातडीने निविदा काढण्यास सुरुवात झाली, या पार्श्वभूमीवर आयोजित पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने ‘शेतकऱ्यांच्या विजयी मेळाव्यात’ ते मार्गदर्शन करताना बोलत होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पाणी संघर्ष चळवळीचे नेते आनंदरावबापू पाटील, जनार्धन झिंबल, हणमंतराव देशमुख, साहेबराव चवरे, मनोहर विभुते, अण्णासाहेब शिरकांडे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले.
एच.बी.गुरव यांनी प्रास्ताविक केले. धर्मराज यादव यांनी स्वागत केले. प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
यावेळी लिंगीवरच्या सरपंच सौ.सुमन झिंबल,राजेवाडीचे सरपंच प्रशांत शिरकांडे, कुरुंदवाडीच्या सरपंच सौ.अरुणा जावीर, मुख्याध्यापिका सौ.जयश्री झिंबल,अविनाश रणदिवे, बाळासाहेब पाटील, संतोष गोटे, शंकर गळवे, के.जे. रॉय, किरण लोकरे, ॲड. गाढवे, स्वामी सर,यांच्यासह पाणी संघर्ष चळवळीतील नेते व राजेवाडी, लिंगीवरे,पुजारवाडी(दि), पांढरेवाडी, उंबरगाव, पिंपरी खुर्द, आंबेवाडी,बोंबेवाडी,वलवण, गुळेवाडी विभूतवाडी, धावडवाडी या गावांतील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी महिला व पुरुष तसेच विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.पाटणकर बोलताना पुढे म्हणाले, आपल्या भागातील दुष्काळाचे चक्र मोडले पाहिजे, यावर उपाय म्हणजे कृष्णेचे पाणी ही भावना होती. 1902 साली कोयना धरणासाठी पहिले इंजिनियर पाठवण्यात आले. शेतकरी पिक घेऊन त्यापोटी मिळालेला कर इंग्रजांना मिळेल, यासाठी हे काम केले, असा कोयना धरणाचा इतिहास सांगून स्वातंत्र्य मिळाले पण आपल्या पाण्याची समस्या कायम राहिली. 1973 साली कृष्णा, कोयना काठाला पाणी मिळाले, कराड, मिरज, वाळवा तालुके यामुळे समृद्ध होत गेले. ताकारीचे पाणी येण्यासाठी चळवळ करण्यात आली. बळीराजा धरणाच्या लढ्यापासून ‘समान पाणी वाटप’ ही संकल्पना उदयास आली. आम्हाला आटपाडी तालुक्यात 1992 साली पाण्याच्या संघर्षासाठी पाचारण करण्यात आले. तेव्हापासून आमचा लढा सुरू आहे.
राज्यपालांनी आटपाडी तालुक्याच्या भेटी दरम्यान आदल्या दिवशी रास्ता रोको आंदोलनातील तालुक्यातील जनतेचा राग बघितला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दौऱ्यावेळी सकारात्मक दृष्टिकोन दाखविला.समान पाणी वाटपाचे शिल्पकार हे दुसरे तिसरे कोणी नसून आमच्या माता-भगिनी आहेत. बारा गावांच्या या आपल्या भागासाठी पूर्वीच मिळवून ठेवलेले पाणी इतरांना देण्यात आले.आता पहिले काम आटपाडीच्या बारा गावांचे होणार आहे, हा निर्धार करूया, हा जनतेचा विजय आहे.
सध्या जरी निविदा प्रक्रियेला मंजुरी मिळाली असली तरी काम कधी सुरू होणार? असे सरकारला वारंवार विचारले पाहिजे. आमच्या देखरेखीखाली काम सुरू झाले नाही, तर आंदोलनाचा चाबूक घेऊन उभे राहू, असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या निवडणुकांचा हंगाम सुरू होत असून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची कामे करणारे कर्मचारी यांना निवडणूकीची कामे लावता कामा नये.दुष्काळी भागातील कामे त्यांना करू द्यावीत. निवडणूक आयुक्तांना याबाबतचे पत्र लिहून कळविण्याबाबतचा ठराव या मेळाव्यात हात उंचावून मंजूर करण्यात आला.
यावेळी बोलताना आनंदरावबापू पाटील म्हणाले, पाण्यासाठी आपण जून 2023 ला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. बारा गावांचा पाणी प्रश्न हाताळता यावा म्हणून मोर्चा काढून सरकारला आपण इशारा दिलेला होता. सरकारला आपण पाण्यासाठी सातत्याने असे इशारे देत होतो. त्यामुळेच या कामाला गती मिळाली.
देशात फसवणूकशाही चालू आहे.शेतकऱ्यांना फसवण्याचे राज्य चालू आहे. लढणाऱ्या शेतकऱ्यांची आंदोलने चिरढण्याचा प्रयत्न चालू आहे.
वगळलेल्या बारा गावांचे काम यापूर्वीच व्हायला पाहिजे होते, पण यासाठी वेळ गेला तो सरकारच्या नाकर्तेपणामुळे. आझाद मैदान, आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला, म्हणून उशिरा का होईना हे काम झाले आहे. कामाचे टेंडर काढले आणि पुढे काम थांबले,असं होऊ द्यायचं नाही, या कामासाठी आचारसंहिता आडवी येणार नाही. सहा महिन्यांमध्ये बारा गावांना पाणी मिळाले पाहिजे. शेतात पाणी आल्याशिवाय शेतकऱ्यांच्या व जनतेच्या चेहऱ्यावर आनंद दिसणार नाही.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती