जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार महा आक्रोश मोर्चा : योगेश पोळ यांची माहिती

प्रगल्‍भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

सातारा जिल्ह्यातील असंघटित कामगारांच्या प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असून त्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली(भारत सरकार) या संघाच्या पुणे मंडळ अध्यक्ष श्रीमती मीनाक्षी बबनराव पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावरती गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी महा आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती योगेश पोळ यांनी दिली आहे. तसेच आपल्या न्याय व हक्कांसाठी सातारा जिल्ह्यातील सर्व असंघटित बांधकाम कामगारांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान,कामगारांनी अनेक वेळा पूर्तता करून देखील आजपर्यंत प्रलंबित असलेल्या अर्जांचा त्वरित निपटारा करावा. ऑनलाइन अर्जामध्ये चुकीच्या व मनमानी पद्धतीने त्रुटी दाखवून नामंजूर केलेले अर्ज लवकरात लवकर मंजूर करावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून पुरविण्यात येणारे मध्यान्य भोजन निकृष्ट दर्जाचे असून ती योजना बंद करून त्या बदल्यात कामगारांना कोरडा शिधा द्यावा अथवा दरमहा एक हजार रुपये द्यावेत. बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे शिल्लक असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या निधीतून दिवाळीपूर्वी कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस द्यावा. सातारा जिल्ह्यातील बेघर कामगारांना हक्काचे घर बांधण्यासाठी शासनाने जागा उपलब्ध करावी. साठ वर्षांवरील कामगारांना त्वरित पेन्शन योजना लागू करावी. सातारा जिल्हा बांधकाम कामगार मंडळाच्या कामगार आयुक्तालयातील सर्व शासकीय पदे त्वरित भरून कामगारांची गैरसोय टाळावी या प्रमुख मागण्या आहेत.