सांगली येथे दि.१४ रोजी ‘अर्थक्रांती’ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा,जीवन गौरव सोहळा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

अर्थक्रांती भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान सांगली जिल्हा यांच्यावतीने रविवार दि. १४ मे २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता सांगली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम (काँग्रेस भवनच्या मागे) येथे ‘अर्थक्रांती सांगली जिल्हा ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. अर्थक्रांतीचे जनक व मार्गदर्शक अनिल बोकील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. माजी खासदार बसवराज पाटील सेडम (संरक्षक भारत विकास संगम) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष व समन्वयक विजय देशमुख दबडगांवकर व अर्थक्रांती भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आहेत.ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येन उपस्थित रहावे असे आवाहन सांगली येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील यांनी केले आहे.


या कार्यक्रमात ‘व्यक्तीला ना पक्षाला, जातीला ना धर्माला, आमचे मत या प्रस्तावाला’ या सूत्राला धरून आणि आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ‘ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती’ या प्रस्तावाला निवडणुकीचा मुख्य मुद्दा बनवण्यासाठी सांगली शहरात हा सोहळा आयोजित केला आहे. प्रत्येक भारतीयाच्या जीवनाची संध्याकाळ सोनेरी बनवण्याच्या या अभियानात सर्वांनी उपस्थित रहावे असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात अर्थक्रांतीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मणराव खटके यांनी म्हटले आहे.


जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील, उपाध्यक्ष नारायण सावंत-पाटील, कोषाध्यक्ष चंद्रशेखर मोरे, कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मणराव खटके, ज्येष्ठ नागरिक मित्र सचिन थोरात, वाळवा,शिराळा,पलूस तालुक्याचे संपर्कप्रमुख सुभाष पवार, संघटक,सल्लागार अरविंद चांडवले,आटपाडी तालुका कार्याध्यक्ष नंदकुमार राक्षे, आटपाडी तालुकाध्यक्ष व्ही.एन‌.देशमुख, चंद्रकांत कुलकर्णी, रंगराव पवार, माई राजे, प्रा.इंद्रायणी पाटील, अशोक कुलकर्णी,गणेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव कुलकर्णी, संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष रोनक शाह, यशस्विता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सुनिता बने, आदि पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


सर्व ज्येष्ठ नागरिकांनी वयाच्या साठ वर्षापर्यंत केंद्र व राज्य सरकारकडे सर्व कर भरलेले आहेत. म्हणून ‘ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच’ हा प्रस्ताव घेऊन ज्येष्ठांच्या सन्मानासाठी व त्यांच्या जीवनाची संध्याकाळ सोनेरी बनवण्यासाठी हा लढा सुरू आहे.
१) ६० वर्षावरील प्रत्येक व्यक्ती ज्येष्ठ नागरिकत्वास पात्र असेल.
२) प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास शासकीय कोषातून दरमहा दहा हजार रुपये महागाई भत्त्याशी जोडलेले सन्मानधन मिळण्याचा कायदेशीर हक्क असेल.
३) प्रत्येक ज्येष्ठ व्यक्ती संवैधानिकरित्या सर्व सामाजिक व्यवस्था, सेवांच्या ‘विशेष दर्जासाठी, (उदा. आरोग्य, व्यक्तिगत संरक्षण, पादचारी मार्ग, वाचनालय, उद्यान, स्वच्छतागृह, करमणूक केंद्र, इत्यादी) पात्र असेल. या विशेष दर्जाच्या सामाजिक व्यवस्था, सेवा ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा अनेक क्षमता लक्षात घेऊन वेगवेगळ्या वा अतिरिक्त स्वरूपात स्थापित केल्या जाव्यात.
४) प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीच्या सामाजिक आदर आणि सन्मानासाठी ॲट्रॉसिटी कायद्याच्या धर्तीवर विशेष कायदेशीर आचारसंहिता निश्चित केली जावी.
५) या प्रस्तावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासन स्तरावर कॅबिनेट दर्जाचे स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक सन्मान मंत्रालय स्थापन करावे केले जावे.
या अर्थक्रांती भारतीय ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानच्या प्रमुख मागण्या आहेत.


ज्येष्ठ नागरिकांचा हा ऐतिहासिक मेळावा प्रथमच सांगली येथे संपन्न होत आहे. आयुष्यभर ज्या मातीशी व देशाशी इमान राखले त्या शेतकरी, शेतमजूर,असंघटित कामगार, वंचित, उपेक्षित, तोलाईदार, माथाडी कामगार यासारख्या सर्व घटकांना आर्थिक विकासाला चालना देणारा हा मेळावा आहे.
देशातील ११ कोटी ज्येष्ठ नागरिक हे उपेक्षित आहेत व त्यांची सद्यस्थिती अतिशय हलखीची आहे. अन्न, वस्त्र, निवारा यापासून वंचित आहेत. शिवाय त्यांना पैशाअभावी स्वतःवर आरोग्यसेवा करून घेता येत नाही. त्यांच्यातील स्वाभिमान हरवत चाललेला आहे.
सद्यस्थितीत जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनी उमेदीच्या काळात देशभक्ती, सेवा करताना चंगळवादाची कास न धरता, तन,मन,धन अर्पण केलेले आहे. त्यांनी केलेली काटकसर व बलिदान यामुळेच देशातील पंचवार्षिक योजना सफल झाल्या.देश प्रगतीपथावर जाताना अनेक पाटबंधारे योजना, रस्ते, शेतीक्रांती, धवलक्रांती या धोरणामुळेच प्रगती करू शकला.
ज्येष्ठ नागरिकांनी टॅक्स स्वरूपाने कोठ्यावधी रुपयांचा निधी सरकारला दिला, म्हणूनच भारताचे चित्र बदलले आहे, ते ज्येष्ठ नागरिकांच्या बलिदानामुळे. याकरिता प्रकृती, वेळ, काळ, तास याचा विचार न करता राष्ट्रीय उन्नती हाच विचार डोळ्यापुढे ठेवला होता. त्यामुळे भारतात अन्नधान्य, रस्ते, पाटबंधारे योजना, ग्रामीण भागाचा सर्वांगीण बदल होऊ शकला.
अलीकडे वाढती लोकसंख्या व देशाचे, समाजाचे भले व्हावे ही इच्छा अलीकडच्या पिढीत बऱ्याच प्रमाणात कमी झालेली दिसते. जेष्ठ नागरिकांची मागणी अवास्तव नाही. राष्ट्रीय सकल उत्पन्नाएवढीच आहे. याकरिता देशाच्या एकूण अंदाजपत्रकापैकी केवळ सात टक्के रक्कम खर्च केल्यास ज्येष्ठ नागरिकांचे भले होणार आहे.


या गौरव सोहळ्याच्या माध्यमातून
१) ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती हे धोरण जाहीर करावे.
२) प्रत्येक ज्येष्ठ नागरिकास रक्कम रुपये दहा हजार सन्मान धन महागाई भत्ता धरून मिळावे.
३) ज्येष्ठ नागरिकांचे देश व राज्य पातळीवर मंत्रालय असावे.
४) ज्येष्ठ नागरिकांच्या आदर व सन्मानासाठी ॲट्रॉसिटी धर्तीवर कायदा व्हावा.
५) ज्येष्ठ व्यक्तींना आरोग्य, व्यक्तिगत संरक्षण, पादचारी मार्ग, वाचनालय, उद्यान यांची निर्मिती व्हावी.
या मागण्याच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे.


या मागण्या मान्य झाल्यास
१) देशातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
२) तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील
३) भेदभावरहित माणूस म्हणून जगण्याची नव्या मानवता धर्माची सुरुवात होईल.
४) बाजारात क्रयशक्ती वाढेल.
५) देशातील जातिवाद संपुष्टात येईल.
६) ज्येष्ठ नागरिकांची देशपातळीवर व्होट बँक तयार होणार आहे.
या मागण्या घटनेच्या चौकटीत राहून केल्या आहेत.घटनाबाह्य एक ही मागणी यात नाही. अर्थक्रांतीचा हेतू जपान सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून समजून घेतला आहे. सदरचे मेळावे भारतातील प्रमुख ४०० शहरात होणार आहेत. त्यापैकी पहिलाच मेळावा सांगली जिल्ह्यामधील आहे.


या मेळाव्याच्या निमित्ताने चाळीस हजार ज्येष्ठ नागरिक सांगली जिल्ह्यातून येणार आहेत, असे प्रसिद्धीपत्रकात प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मणराव खटके यांनी म्हटले आहे.