खरसुंडी यात्रेतून वृद्धाची चैन व बदामाची चोरी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

खरसुंडी येथील सिद्धनाथाच्या यात्रेत मंदिर परिसरात धोंडीराम शंकर बनगर या ६४ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील चैन व बदाम चोरल्याची घटना घडली. याबाबत आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आटपाडी पोलिसांकडून याबाबत मिळालेली माहिती अशी की, १७ एप्रिल रोजी श्री सिद्धनाथाचा शासनकाठी सोहळा पार पडला. त्यामध्ये दुपारी साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या परिसरात धोंडीराम शंकर बनगर (वय ६४ वर्षे,रा. बनगरवाडी,म्हसवड पो. पुळकोटी ता. माण जि. सातारा) यांच्या गळ्यातील ६२ हजार पाचशे रुपये किमतीची अडीच तोळ्याची सोन्याची चैन व अडीच हजार किमतीचे एक ग्राम वजनाचे सोन्याचे बदाम अज्ञात चोरट्याने चोरून नेले. याबाबतची फिर्याद धोंडीराम बनगर यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून घटनेचा तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.