दिघंचीत पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी आंदोलनाचा इशारा!

दिघंची/ प्रतिनिधी:

दिघंची येथे प्रभाग क्रमांक सहामध्ये दीड महिन्यापासून पिण्याचा पाणीपुरवठा बंद असून ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.आठ दिवसात पाणी पुरवठा चालू झाला नाही तर पंचायत समितीसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिघंची येथील रोहित हणमंतराव देशमुख,सुभाष ढोक, उमेश ढोक, संतोष पुसावळे, शिवाजी पुसावळे आदींनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन आटपाडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,दिघंची येथे प्रभाग क्रमांक सहा मध्ये एसटी बस स्टँडच्या परिसरामध्ये गेल्या दीड महिन्यापासून पिण्याचे पाणीपुरवठा बंद आहे. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली होती.रस्त्याच्या ठेकेदाराने फुटलेल्या पाईप दुरुस्तीच्या जोडणी खर्चासह लाखो रुपये ग्रामपंचायतीकडे जमा केले आहेत.परंतु दिघंची ग्रामपंचायतीच्या गालथान कारभारामुळे गेले दिड महिना जाणीवपूर्वक पिण्याचे पाणी दिले जात नाही. ग्रामसेवक व पदाधिकारी यांना भेटूनसुद्धा वेळ काढूपणा करून टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत व ग्रामस्थांची अवहेलना केली आहे. ग्रामविकास अधिकारीसुद्धा गावात मुक्कामी नसल्याने ते भेटत सुद्धा नाहीत. येत्या आठ दिवसात पिण्याचे पाणी मिळाले नाही, तर आटपाडी पंचायत समिती येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आटपाडी पंचायत समितीचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता, दिघंची ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना देण्याचे केले आहे.निवेदनावर रोहित हणमंतराव देशमुख,सुभाष धोंडीराम ढोक,उमेश ढोक, संतोष शिवाजी पुसावळे,शिवाजी महादेव पुसावळे यांच्या सह्या आहेत.