आटपाडीत लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी
मोहनराव पुजारी /आटपाडी प्रतिनिधी:
राजारामबापूंमुळे अनेक शेतकऱ्यांची मुले आमदार व मंत्री झाली असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सभापती व राजारामबापू यांचे शिष्य बळवंतराव मोरे यांनी आटपाडी येथे केले. राजारामबापू पाटील यांच्या जयंतीनिमित्त आर बी हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राज्य शासनाच्या जनहिताच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे कार्य लोकनेते राजारामबापू पाटील यांनी अखंडपणे केले.शेतकरी शेतमजुरांची मुले समाजकारणात आली पाहिजेत, या विचाराने काँग्रेस पक्षाची दारे त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी खुली केली.त्यांच्यामुळेच संबंध महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांची मुले मंत्री व आमदार झाले.
रावसाहेबकाकांसारखा बापूंचा कार्यकर्ता सत्ता मिळो न मिळो सतत बापूंच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन जनतेची सेवा करीत राहिला. जयंतराव पाटील यांनीही बापूंच्या पश्चात रावसाहेबकाकांना भक्कम आधार दिला असेही ते म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष अनिताताई पाटील यांनी राजारामबापू हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांना गरज भासल्यास सर्वती आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.तर उद्योजक प्रदीप देशपांडे यांनी लोकनेते राजारामबापूंच्या कार्याचा अभ्यास तरुण पिढीने केला पाहिजे असे सांगितले.
राजारामबापू हायस्कूलचा इयत्ता बारावी व दहावीचा निकाल शंभर टक्के लावून आटपाडी शहरात सर्वश्रेष्ठ विद्यालय म्हणून मुख्याध्यापकांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरज पाटील,भवानी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष बाळासाहेब चांडवले, रमेश पवार,किशोर गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.दादासाहेब मोटेे यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.
आटपाडी तालुक्याचे जेष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील व सर्व कुटुंबिय यांच्यावतीने त्यांच्या निवासस्थानीही लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.



संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन