सांगली महानगरपालिकेच्या आयुक्तावर बूट फेकला!

एकजण ताब्यात; घटनेनंतर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

सांगली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांच्यावर बूट फेकून शिवीगाळ केल्याची घटना घडली.कैलास काळे यास याप्रकरणी ताब्‍यात घेतले आहे. आयुक्‍तांवर झालेल्या हल्ल्यानंतर महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करुन महापालिकेसमोर निदर्शने केली आहेत.
याबाबत माहिती अशी की,लोकशाही दिनानिमित्त सांगली महापालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये विविध तक्रारी ऐकून घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. यामध्ये आयुक्त, उपायुक्त यांच्या उपस्थितीत सुनावणी सुरू होती. यावेळी कैलास काळे यांनी गुंठेवारी प्रमाणपत्राबाबत असणारी त्यांची तक्रार आयुक्त यांच्यासमोर सादर केली. परंतु, कायदेशीरदृष्ट्या आयुक्तांनी ही तक्रार मान्य करण्यात येत नसल्याचे सांगितले. याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रार दाखल करण्यास सांगितले.
कैलास काळे यांनी महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांना शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर पायातला बूट फेकून मारला. या घटनेनंतर उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कैलास काळे याला ताब्यात घेत सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.काळे यांची तक्रार आणि मागणी आपल्या अखत्यारित येत नसल्याचे स्पष्ट केले होते,असे आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले.
आयुक्त सुनिल पवार यांच्यावरील हल्ल्यानंतर महापालिका क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले व सांगली महापालिका कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा काम बंद सुरूच राहील असा इशारा दिला आहे.कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने नागरिकांचे होणारी गैरसोयी लक्षात घेऊन आयुक्त पवार यांनी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेवून नागरिकांची गैरसोयी टाळावी असे आवाहन केले.