भाजपचे दूध दरवाढीचे आंदोलन निव्वळ फार्स: राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख

अक्षय बनसोडे/देवानंद जावीर
दिघंची /प्रतिनिधी:

भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी केलेले आंदोलन केवळ फार्स आहे, गायीच्या अंगावर म्हशीचे दूध ओतून केलेले हे आंदोलन पू्र्वनियोजित स्टंट आहे.यासाठी ते दूध विकत घ्यावे लागले,असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
ते पुढे म्हणाले,गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता होती,त्या वेळी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. डाळींब,पिक विमा असे अनेक प्रश्न गंभीर आहेत.भाजपने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. दुधाला दर दिलाच नाही.
आघाडी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी दोन लाखाच्या आतील माफ करून दुधाला दर दिला व पंधरा दिवसात दुधाला अजून चांगला दर देणार आहेत. शेतकऱ्यांची व शेतीची पुरेपूर माहिती असलेले माजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचे हे आघाडी सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत,पण उगाच विरोध करून शेतकऱ्यांविषयीचा खोटा कळवळा भाजपा नेते आणत आहेत.भाजपाच्या काळात शेतकऱ्यांना आपली जनावरे विकण्याची वेळ आली होती.
पाच वर्षात भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांच्या जनावरांना चारा छावणी सुद्धा दिली नव्हती.आंदोलन केल्यानंतर त्यांनी चारा छावण्या सुरू केल्या. जनावरांचे प्रचंड हाल केले होते.आम्ही जयंत पाटील यांच्याकडे मागणी करून चारा छावणी आणली होती.  भाजपच्या लोकांना शेतकऱ्यांविषयी काही तळमळ वाटली नाही.या आघाडी सरकारच्या शेतकरी हिताचे धोरण भाजपला पटत नाही,म्हणून असे खोटे आंदोलने करून शेतकऱ्यांना फसवण्याचे काम करत आहेत.जर तुम्हाला आंदोलन करायचे आहे,तर ते केंद्राकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून करा असे आवाहन हणमंतराव देशमुख यांनी भाजप नेत्यांना पत्रकार परिषदेत केले.
ते पुढे म्हणाले,शेतकऱ्यांचे खरे नेते हे शरद पवार असून, महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यापासून कोणतेही कागदपत्र न घेता पेपरलेस पद्धतीने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनाही लवकरच कर्जमाफीची घोषणा हे सरकार करेल.
गाईच्या दुधाला 32 रुपये इतका दर मिळावा अशी आमचीही मागणी आहे. परंतु त्यासाठी दुधाला दहा रुपये प्रति लिटर, दूध भुकटीला 50 रुपये प्रति किलो इतके अनुदान भाजप नेत्यांनी केंद्राकडून मागावे, असे आवाहनही भाजप नेत्यांना त्यांनी केले. महाराष्ट्र सरकार हे शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे.शेतकऱ्यांचे सरकार आता सत्तेवर आले आहे.   भाजपच्या काळात शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे असे ते म्हणाले.