बेळुंकी येथे हिवराच्या झाडाच्या शेंगा खाऊन विषबाधा

नऊ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोसारी

बेळुंकी ता‌. जत येथे हिवराच्या झाडाच्या शेंगा खाऊन नऊ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एकूण बारा ते पंधरा मेंढ्या उपचारादरम्यान बचावल्या.
बेळंकी बागेवाडी येथील रहिवासी सचिन मच्छिंद्र सरगर, तानाजी मच्छिंद्र सरगर, प्रकाश तुकाराम चौगुले यांच्या एकत्रित कळपात चरत असलेल्या मेंढ्या गुरुवारी दुपारी रानात चरत असताना हिवराच्या झाडाच्या शेंगा जास्त प्रमाणात खाल्ल्याने ही दुर्दैवी घटना घडली.
मेंढ्यांची प्रकृती बिघडायला लागलेली दिसताच मेंढपाळ सचिन सरगर यांनी ही घटना जवळील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. कदम आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. राठोड यांच्याशी तात्काळ संपर्क करून घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठा अनर्थ टळला. डॉक्टरांच्या उपचारादरम्यान 12 ते 15 प्रतिकूल परिस्थितीतील मेंढ्यांचा प्राण वाचला.
दरम्यान आलेल्या निकषावरून डॉक्टरांनी असे सांगितले की, हिवराच्या झाडाच्या शेंगा जास्त प्रमाणात खाऊन सदरील दुर्दैवी घटनेत नऊ मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगून मृत मेंढ्यांचे दफन करण्यास सांगितले.
बदलत्या काळानुसार माडग्याळी मेंढीस आलेले महत्त्व व तिची वाढलेली किंमत आणि दुसरीकडे मेंढ्या चराईसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र, पावसाची अनियमितता या सर्व प्रतिकूल परिस्थितीतून आपले जीवन जगत असताना अशा काही दुर्दैवी घटनेत मेंढपाळ पशुपालक अडचणीत सापडत आहे. सदर दुर्दैवी घटनेत एकूण नऊ माडग्याळी मेंढ्या मृत पावल्या असून त्यांच्या प्रत्येकी सुमारे 20 ते 25 हजार इतक्या किंमती असून दीड ते दोन लाख रुपये नुकसान झाले आहे.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. कदम, डॉ. राठोड, बागेवाडी गावचे नूतन सरपंच करण शेंडगे, मेंढपाळ आर्मी जत तालुका उपाध्यक्ष सुभाष हाके,बेळुंखी गावचे काही प्रशासकीय अधिकारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच शासनाकडून संबंधित मेंढपाळास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मेंढपाळ आर्मी यांच्यासह उपस्थित नागरिकांकडून होत आहे.