स्व.धुळाजीराव झिंबल यांच्या पावलावर पाऊल ठेवून निकोप कार्यकर्तृत्व करा: विठ्ठलराव मदने-पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पिलीव

स्व.धुळाजीराव झिंबल यांचे कार्यकर्तृत्व अजरामर व महान आहे. सर्वसामान्यांसाठी त्यांच्या विचारधारेचा अवलंब करून निकोप कार्यकर्तृत्व करा,असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठलराव(आप्पा) मदने-पाटील यांनी पिलीव येथे केले.


लिंगीवरे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सौ.सुमन सुभाष झिंबल यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.


सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जनार्धन झिंबल, सेवानिवृत्त डीवायएसपी एल.पी.शेजाळ, लिंगीवरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आगतराव खांडेकर, पिलीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमोल मदने-पाटील,सुभाष झिंबल,शंकरराव मदने, सौ.निलावती मदने-पाटील,भगवानराव मदने-पाटील,ॲड.सुकुमार मदने-पाटील, पुरुषोत्तम मदने-पाटील,पंकज मदने-पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.अरुणा मदने-पाटील,सौ.सुरेखा शेजाळ,सौ.करुणा मदने-पाटील,चेतन मदने-पाटील, प्रगल्भनायकचे संपादक लक्ष्मणराव खटके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय धुळाजीराव झिंबल यांनी आटपाडी तालुक्यासह परिसरातील गोरगरीब जनतेसाठी महान कार्य केले.सामाजिक कार्यातही ते अग्रेसर होते.पिलीव परिसरात त्यांची राजकीय नाळ होती.सभापती पदाच्या प्रवासासह राजकीय प्रवासामध्ये त्यांना या भागाचा सहयोग लाभला. स्वतःची घरची शिदोरी घेऊन ते समाजातील लोकांचे व गोरगरीब जनतेचे कार्य करीत राजकीय वाटचाल केली. त्यामुळे त्यांच्या कार्याचा आदर्श सामान्य लोकमनावर प्रतिबिंबित झाला आहे. त्यांच्या विचारांचा वारसा व वसा जपून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून कार्य करावे.निकोप राजकारण व समाजकारण करून त्यांचे कार्य पुढे चालू ठेवावे असे आवाहन मदने-पाटील यांनी केले.

यावेळी सेवानिवृत्त डी वाय एस पी एल.पी.शेजाळ यांच्यासह उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.