


रसायनशास्त्रात पीएचडी मिळवणाऱ्या वाक्षेवाडीच्या डॉ.सावित्री वाक्षे-मोटे यांचा जीवन प्रवास
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
डोंगरदऱ्यातील शालेय प्रवासाचा अडथळा पार करून नजीकच मिळेल तिथं शिक्षण घेत वाक्षेवाडी येथील सावित्री बाबासाहेब वाक्षे या वाक्षेवाडीच्या सुकन्याने रसायनशास्त्रातील डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे त्यानिमित्त वाक्षेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
घरापासून शाळेचे अंतर हे अडीच किलोमीटर! अडीच किलोमीटर पायपीट करत शाळा गाठायची !दिवसभर शाळा केली की नंतर घरची काम नेहमीच पाचवीला पुजलेली असायची! अभ्यास करायला वेळही मिळायचा नाही! अशा परिस्थितीमध्ये पहिली ते चौथीचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी येथे झाले. पहिल अक्षर हे गुरुवर्य मुढे मॅडम यांनी हातात पेन्सिल धरून स्वतःचे नाव काढायला शिकवले.
चौथी ते सातवीपर्यंतचे शिक्षण हेही वाक्षेवाडी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी झाले. गणवेश फाटला तरी त्याला ठिगळं लावून वर्षभर कसा वापरता येईल याकडे माझा जास्त कल असे. पहिली ते सातवी पर्यंत मी वर्गात पहिला नंबर कधीच सोडला नाही.आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण लोकमान्य हायस्कूल निंबवडे या ठिकाणी झाले. घरापासून निंबवडेही दोन किलोमीटरवर होते. पायपीट ही पाचवीलाच पुजलेली होती. परिस्थिती बेताची असल्याने शाळेला जायला सायकलसुद्धा मिळाली नाही. वय जरी कमी असलं तरी घरचे दहावी झालं की मुलींचं लग्न करून देण्याची परंपरा होती .परंतु माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये टॅलेंट पाहिले आणि पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या अंगावरती फाटक बनियन आणि फाटलेला टॉवेल आडवा लावून आयुष्यभर शेती आणि शेळ्या मेंढ्यांच्या जीवावरती आमच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट घेऊन आम्हाला लागणारं आर्थिक देणं आहे ते कमी पडू दिलं नाही.
अकरावी बारावीचं शिक्षण हे भवानी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आटपाडी या ठिकाणी झाले. बारावीनंतर एंट्रन्स एक्झाम देऊन मला बीएससीला आटपाडी कॉलेज आटपाडीला ऍडमिशन मिळाले. मला डॉक्टर व्हायची इच्छा होती, परंतु मी डॉक्टर होऊ शकले नाही. म्हणून मी बी एस सी ला ऍडमिशन घेतले.बीएससीमध्ये मी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला. त्यावेळी मला 85 टक्के गुण मिळाले.यामध्ये जाधव सरांचे खूप योगदान लाभले.
पुढे रसायनशास्त्रामधून एमएससी केली. काही काळ teaching चे काम केले.एमपीएससी मधून सिलेक्शन झाल्यावर गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी काही काळ विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. लग्न झाल्यावर माझ्या सासरच्या लोकांनीही मला पीएचडी करण्यासाठी खूप मदत केली. 2016 साली पीएचडी करण्यासाठी मी प्रवेश घेतला. 2022 साली मला कोल्हापूर विद्यापीठातून पीएचडी मिळाली. पीएचडीसाठी माझा विषय synthesis and photophysical behaviour of bioactive Aza heterocycles यावर मी संशोधन केले. या संशोधनाचे फायदे सर्वसामान्य लोकांना बाजारात मिळणारी औषधे परवडणारी नाहीत, त्यासाठी प्रभावी नॅनो पार्टिकलची निर्मिती केली. मी आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये जाऊन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत, तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये १० हून अधिक ठिकाणी माझे संशोधन सादर केले आहे.
सावित्रींच्या संशोधनाचा ठसा जगामध्ये उठला गेला. वाक्षेवाडी गावची कन्या डॉ. सावित्री वाक्षे-मोटे यांचा सत्कार जिल्हा परिषद शाळा वाक्षेवाडी या ठिकाणी घेण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक तसेच माजी सरपंच आप्पासाहेब वाक्षे, उपसरपंच आबासाहेब गलांडे, आदर्श शिक्षक अशोक मोटे, भानुदास मेटकरी ,सावित्री वाक्षे यांचे वडील बाबासाहेब वाक्षे, तसेच वाक्षेवाडी गावचे पोलीस पाटील आप्पासाहेब मोटे, अजित वाक्षे, विश्वनायक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय वाक्षे, अंगणवाडी सेविका संगीता वाक्षे,शांताबाई वाक्षे आणि डॉ. यांचे पती डॉ. गुरुनाथ मोटे हेही या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक