जिल्ह्यातील शैक्षणिक प्रकल्प राज्याला आदर्श:आमदार गोपीचंद पडळकर

नामवंत विद्यार्थी घडवण्यासाठी नियमितपणे स्पर्धांची संधी उपलब्ध करावी: माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख
दिघंची येथे ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची/आटपाडी

सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल, नव्याने येणारा मॉडेल अंगणवाडी तसेच कार्यान्वित होत असलेला डिजिटल स्कूल यासारखे शैक्षणिक प्रकल्प राज्याला पथदर्शी असून ते आदर्श आहेत, असे मत
आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडले. तर नामवंत विद्यार्थी घडवण्यासाठी तालुक्यामध्ये नियमितपणे शैक्षणिक कार्यक्रमांच्या स्पर्धांची संधी शिक्षक व शिक्षण संस्थांनी उपलब्ध करून द्यावी, असे मत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी दिघंची येथे मांडले.
दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या दिघंची हायस्कूल व र.मि.कलाल ज्युनियर कॉलेज येथे ५० व्या आटपाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण व समारोप प्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर आयोजित आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग व दिघंची हायस्कूल दिघंची यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
आटपाडी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सचिन भोसले, दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव एच.यु.पवार, माजी उपसभापती बळवंतराव मोरे, श्रीमंत बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेचे संचालक सावंता पुसावळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नानासाहेब मेनकुदळे,आटपाडी तालुका भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष प्रणव गुरव,गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी व विज्ञान सल्लागार अशोक म्हेत्रे,विस्तार अधिकारी मैनाताई गायकवाड, सुभद्रा गायकवाड व हसबे, प्रशांत चंदनशिवे, समूह साधन व्यक्ती सचिन हेगडे,दिघंची गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.एस.एम.साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर यावेळी बोलताना म्हणाले, विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीसाठी विद्यार्थी व शिक्षकांनी वेगवेगळ्या कल्पना मांडून त्या साकारण्यासाठी कष्ट घेतलेले आहे.त्यांचे कौतुक व्हावे म्हणून हा सोहळा संपन्न होत आहे. जिल्ह्यातील शाळांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून खाजगी संस्थांच्या तुलनेत या शाळांमध्ये विशेष उपक्रम राबवले जात आहेत. दिघंची येथे जिम्नॅस्टिक हॉल साठी पाठपुरावा करू. क्रीडा विभागाच्या साडेतीन कोटी रुपयांचा निधी पडून आहे. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांनी खूप चांगले काम केले आहे.१७० शाळा विकसित करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या मुलींचा उपयोग करून शालेय विकासाला चालना दिली जात आहे. आटपाडी तालुक्यातील १९ शाळा मागील टप्प्यात पूर्ण केल्या आहेत. गुणवत्तेमुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये ७२०० पटसंख्या वाढली आहे. राज्यामध्ये सांगली जिल्हा हा शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारे एकमेव उदाहरण आहे. मॉडेल स्कूलचा प्रयोग राज्याला पथदर्शी आहे. आपल्या जिल्ह्यातील मॉडेल अंगणवाडी हा दुसरा प्रयोग अतिशय चांगला प्रयत्न होत आहे. अंगणवाडीच्या मुलांसाठी पुस्तके निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत. सांगली जिल्ह्याने महाराष्ट्र राज्यात ही संकल्पना उदयास आणली आहे.
आमदार पडळकर पुढे म्हणाले की, आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना आता काही काळातच चांगल्या सुविधा असणारा दवाखाना पहावयास मिळवणार आहे. स्मार्ट पीएचसी ची संकल्पना जिल्हा परिषद राबवणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लोकांना दर्जेदार उपचार मिळणार आहेत. तसेच डिजिटल स्कूल साठी आठ ते पंधरा दिवसात १८३ शाळांना निधी मिळून ते काम पूर्ण होईल. त्यामुळे खडू फळा ही शिक्षकांना परंपरेने असलेली पद्धत आता कमी होऊन अत्याधुनिक सुविधांची काष्टी धरणार आहेत. डिजिटल स्कूलसाठी माझा संपूर्ण चार कोटी रुपयांचा निधी मी दिला असून उर्वरित निधीसाठी माझ्या सहयोगी आमदार मित्रांकडे पाठपुरावा करणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्रअण्णा देशमुख बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची वरचेवर संधी उपलब्ध करून दिले पाहिजे. आटपाडी तालुक्यांमध्ये शैक्षणिक संस्थांचे कार्य चांगले असून या संस्थांनी सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणे आवश्यक आहे. सध्या तालुक्यामध्ये टेंभूचे पाणी आले असून पाण्याबरोबर अनेक समस्याही वाढल्या आहेत. शेतकरी अडचणीत आहे. त्यासाठी उपाय योजना होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने एकत्रित आणून तालुक्यामध्ये विकासाची स्पर्धा निर्माण व्हावी. शासनाकडून येणारा निधी विज्ञान प्रदर्शनासारख्या कार्यक्रमाला यावर्षी मिळाला नसला तरी दानशूर लोकांनी यासाठी मदत केली. पालकांसमवेत अशा विकासाच्या कामांना व शैक्षणिक कामांना सहकार्य घेऊन असे उपक्रम राबवून नामवंत विद्यार्थी घडवू शकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष एस.डी.शिंदे यांनी प्रास्ताविक केले.निनाद मोरे यांनी अध्यक्ष निवडीला अनुमोदन दिले. मुख्याध्यापक डी.एन.कदम यांनी स्वागत केले.कुमार नळ-भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षण विस्तार अधिकारी व विज्ञान सल्लागार अशोक म्हेत्रे यांनी आभार मानले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमांचे पूजन करण्यात आले. करून भोसले या विद्यार्थिनींने स्वागतगीत गायले.महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धपणे विज्ञान प्रदर्शनासाठी संयोजन केले.हायस्कूलच्या शिक्षिकांनी आकर्षक रांगोळीने व कलाशिक्षक डी.के.तुपे यांनी फलक सजावट केली.
यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या आटपाडी तालुक्यातील ५६ विद्यार्थ्यांचा दिघंची हायस्कूल व आटपाडी पंचायत समितीचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला. विठलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरीमधील विद्यार्थिनी वेदांती विजय सावंत हीने विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शनाच्या प्राथमिक विद्यार्थी कृती गटामध्ये
प्रथम क्रमांक: अजिंक्य कांतीलाल कारळे, दिघंची हायस्कूल दिघंची
द्वितीय: यशराज विकास ठिगळे, सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी
तृतीय :अनुष्का रोहित जावीर, जिल्हा परिषद शाळा निंबवडे नं. दोन
उत्तेजनार्थ: मोनिका धनाजी माने, जिल्हा परिषद शाळा, हिवतड
माध्यमिक विद्यार्थी कृती गटामध्ये
प्रथम क्रमांक: प्रतीक भारत माळी, दिघंची हायस्कूल दिघंची
द्वितीय क्रमांक: राजाराम बापू हायस्कूल आटपाडी
तृतीय क्रमांक: सोहम रघुनाथ सागर, गुरुकुल विद्यालय आटपाडी
उत्तेजनार्थ : ओम राजाराम यमगर,श्रीमंत बाबासाहेब देशमुख हायस्कूल बनपुरी तडवळे
शिक्षक निर्मित साहित्यामध्ये
प्राथमिक शिक्षक कृती गटामध्ये दिपाली अनंत देवकर, जिल्हा परिषद शाळा लक्ष्मीनगर गोमेवाडी
माध्यमिक शिक्षक कृती गटामध्ये अण्णासाहेब रामचंद्र पुजारी, दिघंची हायस्कूल व आर.एम.कलाल ज्युनिअर कॉलेज दिघंची
तसेच प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर गटामध्ये सौ.सरस्वती श्रीराम पेंदूर, दिघंची हायस्कूल दिघंची यांनी प्रथम क्रमांक मिळवले.
खानापूर तालुक्यातील एम.व्ही.लोहार, व्ही.डी.पवार,आर. एस.आर.एस.सलगर, व्ही.बी.खाडे, एन.ए.जाधव व आटपाडी तालुक्यातील एल.जी.खटके, जे.ए.देशमुख, जी. एल.करांडे,एम.बी. देवकर,एम.एम. माडगूळकर यांनी या स्पर्धांचे परीक्षक म्हणून कामकाज पहिले.
इयत्ता सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटामध्ये ५१, इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक गटामध्ये ४७ साहित्याची नोंदणी होऊन सहभाग घेतला आहे. शिक्षक गटामध्ये सात साहित्याची व प्रयोगशाळा सहाय्यक/ परिचर गटामध्ये एका साहित्याची नोंदणी करण्यात आली.
आटपाडी तालुका विज्ञान अध्यापक संघाच्यावतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात आली.महाराष्ट्र राज्य गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष एस.डी.शिंदे,आटपाडी तालुकाध्यक्ष ए.एस.नांगरे,बी.पी.जाधव,आर.ए.वंजारी,डी.एन.नागणे, सचिन मोरे,जे.बी.कुलकर्णी,बी.जी.नलवडे,एस.बी.साळुंखे, एस‌.बी‌.देशमुख,एम.बी.देवकर,डी.व्ही.घाडगे यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरळीतपणे पार पाडल्या.
प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये दिघंची हायस्कूलच्या अजिंक्य कांतीलाल कारळे,शार्दुल अमोल मोरे,अमृत दत्तात्रय पांढरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. करगणी येथील श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या समाधान रघुनाथ गंगणमले, अथर्व विजय खिलारी, ओंकार विठोबा बजबळकर यांनी द्वितीय क्रमांक व आटपाडी येथील श्रीमती वत्सलादेवी देसाई गर्ल्स हायस्कूलच्या वैष्णवी सुधाकर भोसले, संजना बाबासाहेब पाटील, समृद्धी सतीश देशमुख यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
महाराष्ट्र राज्य गणित-विज्ञान अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल दिघंची हायस्कूलचे गणित विज्ञान विषयाचे अध्यापक एस.डी.शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
आटपाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,केंद्रप्रमुख,शिक्षक व प्रशासकीय वर्ग तसेच दिघंची हायस्कूल व गर्ल्स हायस्कूलचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी आमच्या प्रगल्वनायक न्यूज चॅनलला भेट द्या.https://youtube.com/live/FL6z0eebJj8?feature=share या लिंकचा वापर करा व बक्षीस वितरण आणि समारोप संपूर्ण कार्यक्रम पहा.