आटपाडीत राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी

आटपाडी/प्रतिनिधी:
राष्ट्रीय नेते शरद पवार यांना १९७८ साली सर्व विरोधी पक्षांनी मोट बांधून पुलोद आघाडीचेवतीने राज्याचे मुख्यमंत्री करण्यामध्ये राजारामबापू यांचा सिंहाचा वाटा होता. तरुण वयात संधी मिळाल्याने संधीचे सोने करण्याचा हातखंडा असणाऱ्या पवार साहेबांनी राजारामबापू व यशवंतरावांचे बहुजनांच्या हिताचे विचार दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवले.बापूंचा कार्यकर्ता म्हणून मला याचा अभिमान वाटतो, असे भावपूर्ण उद्गार राजारामबापूंचे शिष्य व आटपाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बळवंतराव मोरे यांनी आटपाडी येथे काढले.
राजारामबापू पाटील यांच्या 101 व्या जयंती सोहळ्याच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भवानी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रावसाहेबकाका पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
बळवंतराव मोरे पुढे म्हणाले, जनहिताच्या शासकीय योजना जर तळागाळापर्यंत पोहोचवायच्या असतील तर शेतकरी,शेतमजूर यांची मुले समाजकारणात आली पाहिजेत,या विचाराने त्यांनी काँग्रेस पक्षाची दारे सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी खुली केली.त्यामुळे संबंध राज्यभर अनेक शेतकऱ्यांची मुले मंत्री व आमदार झाली.
आटपाडी तालुक्यांमध्येही रावसाहेबकाका पाटील यांच्यासारखा कार्यकर्ता सत्ता असो वा नसो बापूंच्या विचारांचा झेंडा खांद्यावर घेऊन बापूंच्या पश्चात जयंतराव पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिले व नामदार जयंतरावांनीही रावसाहेबकाकांचे पालकत्व स्वीकारून त्यांच्यावर सदैव प्रेम करत आले,याचा साक्षीदार आटपाडी तालुका आहे.

समारंभाचे दुसरे प्रमुख पाहुणे आटपाडीचे प्रसिद्ध व्यापारी प्रदिप देशपांडे यांनी राजारामबापू यांच्या कार्याचा अभ्यास तरुण पिढीने केला पाहिजे असे सूचित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.अनिता पाटील यांनी राजारामबापू हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत लागल्यास मदतीचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशालेचा दहावी व बारावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागून गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दादासाहेब मोटेे यांनी प्रास्ताविक केले. समारंभास किशोर गायकवाड,रमेश पवार, बाळासाहेब चांडवले, सुरज पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.बाळासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.

आटपाडी तालुक्याचे जेष्ठ नेते रावसाहेबकाका पाटील व सर्व कुटुंबिय यांच्यावतीने त्यांच्या निवासस्थानीही लोकनेते स्व.राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करण्यात आले.