पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरमध्ये बाधित जमीनधारकांचे योग्य मोबदल्यासाठी दहिवडीत आंदोलन

दहिवडी येथे बाधित जमीनधारकांचे आंदोलन
पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरमध्ये बाधित जमिनीच्या योग्य मोबदल्याची मागणी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड/दहिवडी

पुणे- बेंगलोर ग्रीन फिल्ड या नियोजित केंद्रीय महामार्गासाठी खटाव तालुक्यातील ३३ महसुली गावांतील जमिनीचे संपादन केले जाणार असुन या महामार्गात बाधित होणा-या संबंधित शेतक-यांना जमिनीचा मोबदला बाजार भावाच्या पाचपट सरकारने द्यावा या मागणीसाठी आज माण तालुक्यातील दहिवडी येथील खटाव- माण विभागीय प्रांत कार्यालयासमोर खटाव तालुक्यातील ३३ गावातील बाधित शेतक-यांनी अखिल भारतीय किसान सभाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उमेश देशमुख यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली घोषणा देत आंदोलन करुन
शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना दिले.
पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर हा केंद्रीय महामार्ग पुणे,सातारा, सांगली जिल्ह्यातून विकसित केला जाणार आहे.या महामार्गासाठी जमिनीची मोजणी करुन संपादन करण्याची कार्यवाही सरकारने सुरु केलेली आहे.या महामार्गासाठी जमिनीचे अधिग्रहण करीत असताना त्याचे मुल्यांकन चालु बाजारभाव गृहित धरुनच दोन गुणांकाने व्हायला पाहिजे.असे न करता सरकार या जमिनीचे मुल्यांकन टप्पा शुन्य पध्दतीने करणार असुन हे आम्हास मान्य नाही.
जमिनीचा दर बाजारभावाप्रमाणे गृहीत धरावा,महामार्गाचे जमिनीचे मुल्यांकन ठराविक असताना नविन टप्पा पध्दत वापरु नये,जमिन कब्जेवहिवाटी नुसारच संबंधित स्थावर मालमत्तेचे पंचनामे करुन त्यानुसार निवाडा नोटीसा मिळाल्या पाहिजेत,संबधित शेतक-यांच्या बँक खात्यात भरपाई रक्कम जमा केल्याशिवाय महामार्गाचे काम सुरु करु नये,जमिन अधिग्रहण कायदा 2013 ची कडक अंमल बजावणी करावी, जमिनीचा मोबदला देताना एक गुणांकाने न होता ती दोन गुणांकाने द्यावा व टप्पा पध्दत रद्द करावी इत्यादी मागण्या या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केल्या व या मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांना दिले.
आज सकाळी दहा वाजता सुरु झालेले आंदोलन दुपारी दोन पर्यंत सुरु होते.या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
“यापुर्वी महामार्ग विकसित करताना बाजारभावानुसार व खाजगी वाटाघाटीने सरकारने दर ठरवून शेतक-यांना पाच पट जमिनीचा मोबदला दिलेला होता.असे असताना पुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर महामार्गासाठी बाधित जमिन मालक शेतक-यांना वेगळा दर का ? असा सवाल करुन या महामार्गात बाधित होण्या-या शेतक-यांना बाजार भावाच्या दराच्या पाचपट मोबदला मिळालाच पाहिजे.सरकारने वेळीच योग्य असा निर्णय घेतला नाही तर कराड येथे रविवारी १३ नोव्हेंबरला मेळावा घेऊन आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार”- श्री उमेश देशमुख