संगणक परिचालकांचे विविध प्रश्नांसंदर्भात आमदार पडळकर यांना निवेदन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुका संगणक परिचालक संघटनेने विविध मागण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिले.
आमदार पडळकर यांचा संघटनेने सत्कार केला. यावेळी सांगली जिल्हा सचिव तात्यासाहेब मंडले, आटपाडी तालुका अध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष अविनाश शिंदे, सचिव गणेश देवडकर, खनिजदार विजय मोटे, सुनिल गायकवाड, सुनिल पुजारी, महादेव गळवे,हणमंत गळवे, शिवाजी खटके, अजिनाथ सावत,पोपट पारेकर, बापू झंजे, कुमार हातेकर, प्रवीण तोरणे, जहांगीर मुजावर, तातोबा यमगर,आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून तरुण-तरुणी संगणक परिचालक मागील दहा वर्षापासून काम करत आहेत.राज्यातील सुमारे सहा कोटी ग्रामीण जनतेला शासनाच्या विविध योजना पोहोचवून खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालकांनी केले आहे. शासन, प्रशासन व ग्रामीण जनता यांच्यामधील दुवा म्हणून संगणक परिचालक काम करत आहेत. गाव पातळीवर एक कोविड योद्धा म्हणून काम करून त्यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली आहे.
त्यामुळे त्यांच्या प्रामाणिक कामाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना सुधारित आकृतीबंधानुसार पद निश्चिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याबाबतची मागणी प्रलंबित आहे. त्यांनी यासाठी वारंवार मुंबई आझाद मैदान येथे आंदोलन केली. हा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित असून त्यासाठी नागपूर, मुंबई येथे अनेक आंदोलने करण्यात आले आहेत. २२ फेब्रुवारी २०२१ ते ११ मार्च २०२२ या दरम्यान मुंबई येथील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते.
संगणक परिचालकांच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष घालून राज्यातील सुमारे २३ हजार संगणक परिचालकांना न्याय द्यावा,अशी विनंती त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे केली आहे.