फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ‍विमा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना, (अंबिया बहार) 2022-23 या योजनेची जिल्ह्यात एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, मुंबई मार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत विमा प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत, अंबिया बहार मध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी यांना विमा बँकाकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत द्राक्ष(ब) फळपिकासाठी 15 ऑक्टोबर 2022, केळी फळपिकासाठी 31 ऑक्टोबर 2022 आंबा (क) फळपिकासाठी 31 डिसेंबर 2022 आणि डाळींब फळपिकासाठी 14 जानेवारी 2023 अशी आहे. ही योजना शासन निर्णयातील अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी लागू राहील. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी खातेदारांव्यातिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करता येईल.
अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामा करीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल (उदा. डाळींब व द्राक्ष). केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहाणार आहे. उत्पादनक्षम अधिसूचित वय डाळींब व द्राक्ष 2 वर्ष, आंबा 5 वर्ष या पेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षण घेतल्याचे निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. या योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र शासनाने त्यांचा विमा हप्ता 30 टक्के दरापर्यंत मर्यादित केलेला आहे. त्यामुळे 30 टक्के वरील विमा हप्ता राज्यशासन व शेतकरी स्विकारणे क्रमप्राप्त आहे. 30 ते 35 टक्के पर्यंतचे अतिरिक्त 5 टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्विकारले असून 35 टक्केवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकरी यांनी 50 : 50 टक्के प्रमाणे भरावयाचा आहे.
या योजनेमध्ये पिक निहाय अधिसूचित महसूल मंडळाची संख्या पुढील प्रमाणे आहे. द्राक्ष- (क) पिकासाठी-54, डाळींब पिकासाठी-31, आंबा पिकासाठी-35, व केळी पिकासाठी-33. या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक असल्याने अधिसूचित क्षेत्रातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक खाते असणाऱ्या जवळच्या प्राधिकृत बँका/प्राथमिक कृषि पतपुरवठा सहकारी संस्था/ संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधीशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात योग्य त्या विमा हप्त्यासह, 7/12 खाते उतारा / आधार कार्ड / बँक खात्याचे तपशिल, घोषणापत्र, बागेबाबत छायाचित्र अक्षांश-रेखांश पत्र इत्यादी कागदपत्रासह विहीत वेळेत जमा करावे. बिगर कर्जदार फळपिक उत्पादक शेतकऱ्यांनी बँकेतील गर्दी टाळण्यासाठी प्राधिकृत आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क करुन सहभाग नोंदवावा. या योजनेंतर्गत विहीत मुदतीत नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी व दायित्व विमा कंपन्याचे आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
अधिसूचित फळपिकनिहाय, विमा हप्त्यात शेतकरी हिस्सा, समाविष्ट धोके व विमा संरक्षण कालावधी अनुक्रमे पुढीलप्रमाणे आहे. द्राक्ष (ब) – 3 लाख 20 हजार रूपये, 16 हजार रूपये, अवेळी पाऊस, 16 ऑक्टोबर 2022 ते 30 एप्रिल 2023. गारपिटसाठी – 1 लाख 6 हजार 667 रूपये, 16 हजार रूपये, गारपिट, 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023. केळी – 1 लाख 40 हजार रूपये, 7 हजार रूपये, कमी तापमान – 1 नोव्हेंबर 2022 ते 28 फेब्रुवारी 2023, वेगाचा वारा – 1 मार्च 2023 ते 31 जुलै 2023 , जादा तापमान – 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2023. गारपिटसाठी – 46 हजार 667 रूपये, 7 हजार रूपये, गारपिट, 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2023. आंबा – 1 लाख 40 हजार रूपये, 16 हजार 100 रूपये, अवेळी पाऊस – 1 जानेवारी 2023 ते 31 मे 2023, कमी तापमान – 1 जानेवारी 2023 ते 28 फेब्रुवारी 2023, जास्त तापमान – 1 मार्च 2023 ते 31 मार्च 2023, वेगाचा वारा – 1 एप्रिल 2023 ते 31 मे 2023. गारपिटसाठी – 46 हजार 667 रूपये, 7 हजार रूपये, गारपिट, 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मे 2023. डाळींब – 1 लाख 30 हजार रूपये, 13 हजार रूपये, अवेळी पाऊस – 15 जानेवारी 2023 ते 31 मे 2023, जादा तापमान – 15 एप्रिल 2023 ते 31 मे 2023, जास्त पाऊस – 1 जून 2023 ते 31 जुलै 2023. गारपिटसाठी 43 हजार 333 रूपये, 6 हजार 500 रूपये, गारपिट, 1 जानेवारी 2023 ते 30 एप्रिल 2023.