आटपाडी येथे महिलांसाठी वक्तृत्व कौशल्य कार्यशाळा संपन्न

कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड दिल्यास उत्तम नेतृत्व घडते-प्रा.संतोष जाधव यांचे मत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
वक्तृत्व ही प्रयत्नसाध्य कला असून थोडी मेहनत घेतल्यास व्यक्ती उत्तम वक्ता होऊ शकते तसेच कर्तृत्वाला वक्तृत्वाची जोड दिल्यास समाजाला अपेक्षित नेतृत्व निर्माण होऊ शकते . असे मत राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल सांगलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष जाधव यांनी व्यक्त केले .
आटपाडी तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित ‘होय मी सभा जिंकणारच’, या भाषण कौशल्य कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख उपस्थित होते.
आटपाडी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा अनिता पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्री . जाधव यांनी भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी आवश्यक गुण, वाचन, भाषाशैली, निरीक्षण, अभिव्यक्ती याबाबत सुमारे दोन तास मार्गदर्शन केले. तसेच कधीच न बोलणाऱ्या महिलांना व्यासपीठावर त्यांनी बोलते केले . या प्रशिक्षणामुळे व्यासपीठावर बोलण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली .
आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक करून असे प्रशिक्षण युवक आणि सर्वच कार्यकर्त्यांनाही द्यावे अशी मागणी केली.
सर्व संकटे मोडून काढणाऱ्या स्त्रिया प्रत्येक क्षेत्र जिंकू शकतात. भीती, न्यूनगंड दुर सारून आत्मविश्वासाने वाटचाल केल्यास प्रत्येक माऊली, प्रत्येक ठिकाणी यशस्वी होवू शकते. त्यासाठी राष्ट्रवादीचे व्यासपीठ सर्वांना प्रेरक आहे .असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी व्यक्त यावेळी केले .
पुरुष प्रधान संस्कृती आणि समाज व्यवस्थेनेच स्त्रियांवर मोठा अन्याय केला . हे करायचे नाही, ते करू नकोस, ते तुला जमणार नाही, ते तुझ्या कुवती बाहेरचे आहे, असे शेकडो प्रकारचे निर्बंध लादत महिलांवर प्रचंड अन्याय केला गेला . प्रचंड धैर्यवान, शुर, धाडसी, कणखर, ध्येयवेड्या असणाऱ्या महिलांना असंख्य निर्बंधातून मानसिकरित्या हतबल, अगतिक, निराशावादी, भित्रे बनविले गेले. याकडे सादिक खाटीक यांनी लक्ष वेधले .
शेकडो वर्षापूर्वी स्त्रियाच राज्यकर्त्या होत्या . शेतीचा शोध महिलांनीच लावला . प्रचंड दुःख, यातना, संकटे, अनंत अडचणींवर मात करून जगणाऱ्या स्त्रियांनी कधी – कुठे आत्महत्या केल्याचे एखादे तरी उदाहरण आहे का ? राज्यात, देशात आत्महत्या केलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या विधवांनी पोटच्या मुलाबाळांचे शिक्षण, संगोपन, वृद्ध – आजारी सासू – सासरे यांचे सर्व सोपस्कर पार पाडत एकूणच शेतीसह प्रपंचाचा गाडा मोठ्या धैर्याने ओढला आहे . अत्यंत विदारक परिस्थितीवर मात करीत स्त्रियांनीच खरी मर्दानगी दाखवून दिली आहे . जीवनात निराशा – संकटे आली म्हणून या माऊलीने कधी दारूला जवळ केले नाही . म्हणून प्रत्येक माऊलीने गोरा – काळा, उच – नीच, गरीब – श्रीमंत, वंचित, उपेक्षित,मागास अशा कोणत्याही भेदांकडे लक्ष न देता समर्थपणे वाटचाल केल्यास ती कुटूंब सावरू शकतेच . तथापि गल्ली, वार्ड, गाव , शहर तालुका, जिल्हा, राज्य अगदी देश – जागतिक स्तरावर कोणत्याही क्षेत्रात ती अव्वल येवू शकते . प्रचंड कर्तृत्वाच्या जन्मजात शिदोरीने सर्वसामान्य, अडाणी, गरीब, सोशीक माऊलीही सर्वच व्यवस्थेला नेतृत्व देवू शकते . त्यासाठी आत्मविश्वासाने पाऊले टाका, प्रत्येक पाऊल तुम्हांला यशाकडेच नेणारे ठरेल. भाषण कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम महिलांना नक्कीच फायदेशीर ठरेल असा विश्वास सादिक खाटीक यांनी व्यक्त केला .
आटपाडी वक्ता सेलचे अध्यक्ष संताजी देशमुख यांनी भाषण कलेसाठी आवश्यक गोष्टींची माहिती दिली.
आटपाडी तालुक्यातील निवडक तीस महिलांना हे प्रशिक्षण देण्यात आले. स्वागत तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी कासार यांनी केले. तर आभार नुतन तालुका उपाध्यक्ष सौ. अर्चना जगताप यांनी मानले.