प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
म्हसवड
म्हसवड येथील मंदिरातील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या दोन्ही पाषाणमूर्तींना वज्रलेप करण्याचे नियोजन येथील गुरव समाज व सिद्धनाथ देवस्थान ट्रस्टने घेतल्याने मंगळवार दिनांक ६ सप्टेंबरपासून सव्वा महिना मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्ट कडून सांगण्यात आले.
श्रींच्या वज्रलेपाबाबत सविस्तर माहिती , देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आली,की महाराष्ट्र ,आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश व इतर राज्यातील लाखो भाविकांचे हे कुलदैवत व म्हसवडकरांचे ग्रामदैवत म्हणून हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे.सध्या श्रींच्या मूर्तींची बऱ्याच प्रमाणात झीज झाली असून मूर्तींमध्ये अनेक अवयवांची नाजूक अवस्था निर्माण झाली असल्याने येथील गुरव समाज व देवस्थान ट्रस्ट यांनी या बाबीची गांभीर्याने दखल घेतली असून श्रींच्या मूर्तींना वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भाद्रपद शु.एकादशी म्हणजे मंगळवार दिनांक ६ सप्टेंबर २०२२ पासून ,अश्विन कृ. द्वितीया, म्हणजे ११ ऑक्टोबर २०२२ या सव्वा महिन्याच्या वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यास सुरुवात होणार आहे.
प्रारंभी मूर्तीमधील दैवत्व काढण्याचा धार्मिक विधी होणार असून तेव्हापासून वज्रलेप होऊन , प्राणप्रतिष्ठा,होमहवन आदी धार्मिक विधी होईपर्यंत मंदिरामध्ये अहोरात्र अखंड सेवा, मंत्र, जप, साधना, विविध देव स्तोत्रे, गायत्री मंत्र आणि विविध मंत्रांचे पठण आदी धार्मिक विधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यानिमित्त सव्वा महिना मंदिरातील गाभारा बंद राहणार असल्याने श्रींचे दर्शन भाविकांना घेता येणार नसले तरी रविवार, पौर्णिमेदिवशी जसे असते तसे, गरुड खांबापासून भाविकांना दर्शन घेण्याची सोय करण्यात आली असल्याचे, देवस्थान ट्रस्टकडून सांगण्यात आले.
दरम्यान सव्वा महिना वज्रलेप कार्यक्रम सोहळ्यानिमित्त मंदिर गाभारा बंद राहणार असल्याने तमाम ग्रामस्थ व भाविक भक्तांनी मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती