सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माळशिरस तालुक्यात ‘अमृत जवान अभियान’

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस तालुक्यातील आजी, माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांचे विविध प्रकारचे प्रश्न व समस्येवर तोडगा काढण्यासाठी किंवा निपटारा करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या वतीने ‘अमृत जवान अभियान’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज सोमवारी आजी व माजी सैनिकांचे ३० तक्रारी अर्ज दाखल झाले आहेत.अर्जाचा तात्काळ निपटारा करण्यासाठी सदर अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली आहे.
‘अमृत जवान अभियान’ या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील विविध गावातील आजी माजी सैनिकांचे ३० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये अतिक्रमण, मोजणी, वीज कनेक्शन, रस्ता,आदींबाबत अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर अर्जाचा तात्काळ निपटारा करण्यासाठी अर्ज संबंधित विभागाकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवून दिले आहेत, असे जगदीश निंबाळकर यांनी सांगितले.
‘अमृत जवान अभियान’ही मोहीम १/५/२०२२ ते १५/६/२०२२ या कालावधीत तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून, माजी सैनिक, शहिद जवान, कर्तव्यावर असणाऱ्या सैनिकांच्या व कुटुंबातील सदस्य यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहेत. महसूल, भूसंपादन, पुनर्वसन, विविध प्रकारचे दाखले, ग्रामविकास, कृषी विभागाकडील विविध लाभाच्या योजना मिळवण्यासाठी तालुक्यातील आजी, माजी सैनिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा.यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, नायब तहसीलदार आशिष सानप, तुषार देशमुख, महसूल सहाय्यक हनुमंत सुर्यवंशी, त्रिद्ल सैनिक संघटना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आढाव, तालुका अध्यक्ष सुरेश तोरसे, सह सचिव मारुती एकनाथ वाघमोडे,चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.