
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी :
आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळे क्रमांक २ येथील शिक्षक रकमाजी महादेव कोळेकर (वय ३८वर्षे) यांचे रविवारी अपघाती निधन झाले. पात्रेवाडी-शेटफळे मार्गावरील धनाप्पावाडा वस्तीजवळ गाडीची पलटी होऊन झालेल्या अपघातात ही घटना घडली.
मूळचे कोळे ता. सांगोला जि. सोलापूर येथील रहिवासी असलेले रकमाजी महादेव कोळेकर हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळे क्रमांक २ येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत होते. आज महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा करून शाळेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर ते इयत्ता सातवीमधील शिकत असलेल्या मुलाला आटपाडी येथील गुरुकुल विद्यालयात सोडायला आले होते. त्यानंतर इयत्ता दहावीची परीक्षा दिलेला त्यांचा थोरला मुलगा व भाऊ असे तिघेजण परत जात होते. ते स्वतः गाडी चालवत होते. पात्रेवाडी-शेटफळे रस्त्यावर अचानक त्यांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी पलटी झाली. यामध्ये समोरील काच फुटून ते पलटी झालेल्या गाडीतून बाहेर पडले. गाडीतील त्यांचा मुलगा व भाऊ जखमी झाले. मात्र रकमाजी कोळेकर यांना यामध्ये गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना तातडीने आटपाडी येथील रुग्णालयात आणण्यात आले. परंतु त्यांच्यावर काळाने घाला घातला. ही अपघाताची घटना पात्रेवाडी गावाजवळील धनाप्पावाडा वस्तीनजीक घडली.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्व प्राथमिक शिक्षकांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर कोळे (ता.सांगोला) या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
२००६ ते २०१६ या कालावधीत त्यांनी पालघरला उपशिक्षक म्हणून नोकरी केली होती बदली होऊन ते २०१६ साली या शाळेवर रुजू झाले होते सर्वांशी मिळून मिसळून वागणारे मनमोकळ्या स्वभावाचे व सर्वांच्या मदतीला धावून जाणारे तसेच क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी अनेकांची मने जिंकली होती शाळेतल्या कामांमध्येही ते सतत अग्रेसर असत त्यांच्या शाळेला सांगली जिल्ह्यामध्ये आदर्श शाळा म्हणून द्वितीय क्रमांक मिळाला होता त्यावेळी त्यांनी रात्र रात्र मेहनत करून शाळेची स्वखर्चाने अनेक विकासाची कामे केली होती.शाळेसाठी सतत धडपडणाऱ्या, हरहुन्नरी शिक्षकांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन