जत तालुक्याला पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क

जत
जत तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची जतचे आ.विक्रमसिंह सावंत यांनी भेट घेऊन मागणी केली. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेवू अशी ग्वाही दिली. जत तालुका हा ग्रामीण तालुका. अर्थातच शेती आणि पशुधन हे येथील लोकांचे अर्थाजनाचे महत्वाचे साधन आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पाणी व चाऱ्याचा तुटवडा ही समस्या जतवासीयांच्या पाचवीलाच पुजलेली, अशा स्थितीत उपचाराअभावी किंवा वेळेत उपचार न मिळण्यामुळे पशुधन दगावण्याच्या घटनाही वारंवार घडत असतात. अशा परिस्थितीत जत तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालयाची संकल्पना नक्कीच फायदेशीर असून या विषयावर आज मंत्रालयात पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली, याचा नक्कीच आनंद होतोय. लवकरच ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होईल याबद्दल विश्वास आहे.
या बैठकीस पशुसंवर्धन आयुक्त पुणे, कुलसचिव महाराष्ट्र पशु व मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूर, प्रधान सचिव कृषी पद्म विभाग मुंबई, सह सचिव (पशुसंवर्धन) कृषी व विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.