मुचंडीच्या दरेश्वर देवाच्या यात्रेला प्रारंभ

दि.२० रोजी देवाचा नैवेद्य, तर २१ रोजी छबिना व पालखी मिरवणूक
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र,केरळ,गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व नवसाला पावणा-या मुचंडी येथील श्री.दरेश्वर देवाची यात्रा दि. १६ ते २१ एप्रिल, २०२२ अखेर भरविण्यात येत असून या यात्रेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. यात्रेस काल पासून सुरुवात झाली आहे.
मुचंडी येथील श्री. दरेश्वर देवाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याच्या सीमेवरील एक अगळी वेगळी यात्रा म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते.
श्री. दरेश्वर देवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यातील कनमडी तालुका तिकोटा जि.विजापूर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असून त्यांच्या माध्यमातून ही यात्रा भरविण्यात येते. तर द-याप्पाची बहिण जक्कमादेवीचे मंदिर हे ओढापात्रातील एका डोहावर महाराष्ट्र राज्यातील मुचंडी ता.जत. जि. सांगली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येते.
या देवाचे महत्त्व म्हणजे दरिदेवाची बहिण जक्कमादेवीला भाविक भक्तानी नैवेद्य दाखवूनच नंतर जक्कमादेवीचा भाऊ दरिदेव यांना नैवेद्य दाखविला जातो. अशी या देवासबंधी अख्यायिका आहे.
या यात्रेचे संपूर्ण नियोजन कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येते. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक राज्यातील तिकोटा पोलीस बंदोबस्तासाठी असतात.
यात्रेव्यतिरिक्त श्री. दरेश्वर देवस्थान यांच्या वतीने दररोज येथील अन्नक्षेत्रात अन्नदान करण्यात येत आहे.
या यात्रेत ज्याप्रमाणे खंडोबा देवासाठी मुरळी, आई श्री. यल्लमादेवीसाठी जोगती सोडली जाते त्या प्रमाणे श्री. दरिदेवासाठी घुळी सोडण्याची प्रथा पुर्वांपार चालत आली आहे.
या यात्रेचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी देवाला नवस केला आहे व तो नवस पूर्ण झाल्यावर श्री. दरिदेवाच्या प्रत्येक पायरीवर नारळ फोडण्याची प्रथा आहे. त्यामुळे या यात्रेत तामिळनाडू व केरळ येथून मोठ्या प्रमाणात नारळाची आवक होते.
या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य परिवहन विभागाचे वतीने खास यात्रेकरिता जादा गाड्या सोडण्यात येतात.
श्री. दरिदेवाच्या यात्रेचे दोन मुख्य दिवस असून दिनांक २० रोजी श्री. दरिदेवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. हा माण तासगाव तालुक्यातील विसापूर येथील माने घराण्याकडे आहे. तर दुसरे दिवशी पहाटे मुळनक्षत्रावर देवीच्या पालखीची व छबिण्याची मिरवणूक निघून पालखीवर खारीख, खोबरे व भंडारा यांची उधळण होऊन यात्रेची सांगता होते.