
अमित पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व सर्पतज्ज्ञ प्रा. डॉ.शिवाजी विभुते यांना माडगुळे येथील खंडोबा माळ येथे अत्यंत दुर्मिळ जातीचा व विषारी पोवाळा साप आढळला.
या सापाचे इंग्रजी नाव ‘स्लेंडर कोरल स्नेक’ असून याचे शास्त्रीय नाव ‘कॅलोफीस मेल्यान्यूरस’ असे आहे. आटपाडी तालुक्यांमध्ये या जातीच्या सापाची पहिल्यांदाच नोंद झाली आहे.
हा साप एकदम निमुळता असून तो साधारण बावीस इंचापर्यंत लांब वाढतो. याचा रंग मातकट असून डोळे काळे व डोक्यावर पांढरे ठिपके आहेत. तसेच यांच्या शेपटीला दोन रंगाच्या रिंगा असून पोटाकडील बाजूस लालसर व शेपटी खाली निळसर राखाडी रंग आहे. या सापळा चिडवल्यास तो आपले लक्ष डोक्याकडून विचलित करण्यासाठी शेपटीचे वेटोळे घालतो व शेपटी खालील लालसर व निळसर रंग दाखवतो.
आतापर्यंत या जातीच्या सापाची नोंद गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, गोवा, पश्चिम बंगाल या राज्यात तसेच बांगलादेश व श्रीलंका या देशात झालेली आहे.
हा साप विषारी असून याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करते. परंतु अद्याप या सापाच्या दंशाने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद आढळत नाही. सर्पतज्ज्ञ प्रा. डॉ.शिवाजी विभुते यांना आतापर्यंत आटपाडी तालुक्यात १५ जातीचे साप आढळले असून त्यात ५ विषारी, एक निमविषारी व १० बिनविषारी जातीचे साप आढळले आहेत.
“आटपाडी तालुक्यांमध्ये यापूर्वी हा साप कधीही आढळलेला नव्हता. परंतु टेंभूच्या पाण्यातून हा साप आटपाडी तालुक्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सापाची नोंद झाल्यामुळे आटपाडी तालुक्यातील जैवविविधतेमध्ये भर पडलेली आहे.”
प्रा. डॉ. शिवाजी विभुते, विभागप्रमुख, प्राणीशास्त्र विभाग,
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी


संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक