
६ किलोमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :
जत तालुक्यातील धावडवाडीजवळ चारचाकी मोटार गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात अब्दुल समद साजिद शेख हा अडीच वर्षीय चिमुरडा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. तब्बल सहा किलोमीटर या चिमुकल्याला फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संतप्त लोकांनी चालकास घडवून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातामध्ये साजीद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, साजिद खान नालसाब शेख व जबीन शेख हे दांपत्य कामानिमित्त धावडवाडी गावात बुलेट गाडीवरून आपल्या अडीच वर्षीय चिमुरड्याला घेऊन गावात आले होते. धावडवाडी गाव राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक वाहने ये जा करतात. शेख दांपत्य आपले काम आटपून शेताकडे जात असताना महादेव मधुकर कुंडले (रा. जालील्हाळ खुर्द) हा चालक आपली इंडीका गाडी घेऊन मोकाशीवाडी येथील भाडेखोर यांना घेऊन सांगलीकडे निघाला होता.
धावडवाडीजवळ शेख दांपत्य आपल्या चिमुरड्या मुलासमावेत शेताकडे जात असताना त्यांच्या बुलेट गाडीला इंडीका गाडीने (एम.एच. 12 एच.एन 1674) जोरदार धडक दिली. या धडकेत साजिद खान शेख(२७) व जबीन शेख (२५)हे दोघे दांपत्य जागेवर खाली कोसळले. तर अडीच वर्षीय अब्दुल समद शेख हा चिमुरडा इंडिका गाडीच्या धडकेत ठार झाला व हेडलाईटला हा चिमुरडा अडकला.बसस्थानकासमोर हा प्रकार लक्षात येताच काही नागरिकांनी त्यास रोखण्यास प्रयत्न केला. तरीही चालकाने मोटार भरधाव वेगाने पळविली. यामुळे नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान चोरोची गावानजीक आल्यानंतर त्याला लक्षात येताच चालकाने रस्त्याकडेला मोटार थांबून बालकास बाजूला काढून टाकत मोटार पुढे पळवली.तोपर्यंत गावकर्यांनी त्या इंडीका गाडीचा पाठलाग करून चोरोचीजवळ जमावाने त्याला रोखले व बेदम चोप दिला. त्यापाठोपाठ धावडवाडी येथील शेख यांचे नातेवाईकही पोहोचले. त्यांनी अब्दुलसमदला ढालगाव येथील रुग्णालयात नेले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जत येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून अब्दुलसमदचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
यामध्ये साजीद खान शेख व जबीन शेख हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांवर उपचार सुरू असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर इंडीका चालक महादेव कुंडले यांच्यावर कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या