प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
कुरुंदवाडी (ता. आटपाडी) येथील कराड-पंढरपूर महामार्ग ते चवरे वस्तीकडे जाणारा रस्ता आमदार निधीतून मंजूर झाला आहे. परंतु येथील २६ शेतकऱ्यांच्या जमिनी त्यामध्ये जात आहेत. सरहद्दीवरून पाच फुट रुंदीचा रस्ता करण्यास शेतकऱ्यांची सहमती आहे, मात्र १० फूट रुंदीचा रस्ता करण्यास विरोध आहे.
१० फूट रुंदीचा रस्ता होऊ नये, तर सरहद्दीवरून ५ फुट रुंदीचा रस्ता व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी कुरुंदवाडी ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार देऊन विष प्राशन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चवरे वस्तीकडून येणारा व कराड-पंढरपूर महामार्गाला जोडणारा रस्ता हा शेतकऱ्यांच्या जमिनीतून जात आहे. यापूर्वी बैलगाडी येण्या-जाण्या पुरता रस्ता होता. त्या रस्त्यातूनच वाहने ये-जा करतात. सरहद्दीवरून पाच फुटाचा रस्ता व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. तो रस्ता दहा फुटाचा करायचा असून यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने कोणतीही कागदपत्रे देऊ नयेत, यासाठी २६ शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे विषप्राशन करणार असल्याचे तक्रारी अर्जाद्वारे कळविले आहे.
यापूर्वी या रस्त्यासाठी आटपाडीचे तहसीलदार, खानापूर उपविभाग विटाचे उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग आटपाडी यांच्याकडे शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्या आहेत.
१९९९ साली आटपाडीचे तहसीलदार यांनी सरहद्दीवरून पाच फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. तर उपविभागीय अधिकारी खानापूर उपविभाग विटा यांनी ०९/०६/२००० रोजी पाच फुटाचा रस्ता काढण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाप्रमाणे रस्ता व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे,
सार्वजनिक बांधकाम विभागाने दहा फुटाचा रस्ता काढण्याचा प्रयत्न केल्यास व सार्वजनिक बांधकाम विभागास ग्रामपंचायतीने कोणतीही कागदपत्रे दिल्यास आम्ही विषप्राशन करु असा इशाराचा २६ शेतकऱ्यांच्या सहीचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे दिला आहे.
“रस्ता करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतीकडे कागदपत्रांची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचा तक्रारी अर्ज ग्रामपंचायतीकडे आला आहे. शेतकरी व सार्वजनिक बांधकाम विभाग एकत्रित येऊन शेतकऱ्यांचे समाधान झाल्यास संबंधित कार्यालयाला लागणारी कागदपत्रे देण्यास काही हरकत नाही.”
- सविता वगरे
सरपंच, ग्रामपंचायत,कुरुंदवाडी

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती