मायणीत मेंढपाळ आर्मीची मेंढपाळ हक्क परिषद संपन्न!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मायणी:
मेंढपाळांच्या न्याय व हक्काला वाचा फोडण्यासाठी मेंढपाळ आर्मी संघटनेची महाराष्ट्रातील पहिली मेंढपाळ हक्क परिषद मायणी या ठिकाणी संपन्न झाली.या हक्क परिषदेला महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक राज्यातील प्रमुख पदाधिकारी व मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यातील मेंढपाळ तसेच मेंढपाळांच्या समस्या यावर प्रमुख पदाधिकारी यांच्यात विचारविनिमय करून मेंढपाळांच्या हिताचे १३ ठराव यामध्ये पारित करण्यात आले. महाराष्ट्रातील शेळी मेंढी महामंडळ उपलाणी आहे. त्याच्याकडे राज्य व केंद्र सरकारने त्वरित बघावे.आम्हाला गोफणगुंडा उचलायला लावु नका,असा खोचक टोला पदाधिकाऱ्यांनी लगावला.
यावेळी महाराष्ट्रातील मेंढपाळांचे हक्क व त्यांना मिळत असलेले वायदे यावर कवितेचं सादरीकरण करण्यात आले. येत्या काळात मेंढपाळांनी संघटित होण्याची गरज असून संघटित न झाल्यास शासकीय लाभापासून वंचित रहाल,असे प्रतिपादन मेंढपाळ आर्मीचे राष्ट्रीय सांसद प्रमुख अर्जुन थोरात यांनी केले. महाराष्ट्रात मेंढपाळांची होणारी वाताहात पाहता गरिबीचं,दरिद्रीचं जीनं संपविण्यासाठी मेंंढपाळांनी शपथ घेतली.
महाराष्ट्र शासनाने तालुकानिहाय शेळ्या-मेंढ्यांचे प्रदर्शन घ्यावे, मेंढपाळनिर्मित सर्व वस्तुंना राज्य शासनाने हमीभाव बांधुन द्यावा,राहील त्याचं घर, ‘कसेल त्याची जमीन’ च्या धर्तीवर महाराष्ट्रातील मेंढपाळांना कुळकायदा लागू करून शासकीय जमिनी, गायराने,चराऊ कुरणे नावावर करून ७/१२ उतारे द्यावेत,प्रत्येक तालुक्यात शासनाने स्वतंत्र मेंढशाळा उभाराव्यात, मेंढपाळांना संरक्षणासाठी अॅट्रासिटीपेक्षा कडक कायदा करण्यात यावा,गजीनृत्य,गजीढोल,धनगरी ओव्या,बहुरूढ धनगरी गीते यास शासकीय मानधन मिळावे,पशूवैद्यकीय अधिकारी यांनी मेंढवाड्यावर जाऊन लसीकरण करावे,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळास आर्थिक विकास महामंडळ म्हणून मान्यता देऊन २० योजना कार्यान्वित कराव्यात,महाराष्ट्र शासनातर्फे मेंढपाळ व शेळ्या-मेंढ्यांचा शासकीय विमा उतरविण्यात यावा, मेंढीला राष्ट्रीय पशुंचा दर्जा देण्यात यावा, वनकर्मचारी व मेंढपाळ संघर्ष कमी करावा, शासनाने मेंढीला GPS ट्रॅकर बसवून द्यावा,यासह धनगर जमातीचा अनुसूचित जमातींमध्ये सामावेश करण्यात यावा, असे १३ ठराव यामध्ये पारित करण्यात आले.
यामध्ये बोलताना मेंढपाळ आर्मीचे महासचिव नवनाथ गारळे म्हणाले,मेंढपाळ हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याला जीवंत ठेवण्यासाठी सरकारने त्वरित पाऊले उचलायला हवीत,अन्यथा संघर्ष अटळ आहे.
त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष प्रा.चंद्रकांत हुलगे यांनी संघटना मजबूत करण्याचे आदेश पदाधिकारी यांना दिले. १ लाख मेंढपाळ नोंदणी करण्याचे मेंढपाळ आर्मीचे ध्येय असल्याने सर्व पदाधिकारी यांनी झाडुन कामाला लागावे,असे प्रदेशाध्यक्ष हुलगे म्हणाले.
मेंढपाळ आर्मीचे कार्याध्यक्ष अंकुश मुढे म्हणाले, मेंढपाळांचा वनवास आजपर्यंत आपण पाहिला, इथून पुढे मेंढपाळ आर्मी मेंढपाळांच्या सुख-दुःखात सामिल होऊन न्याय हक्काला वाचा फोडेन.
‘संघटन में शक्ती हैं’ म्हणत मेंढपाळ आर्मीचे संघटक प्रा.राहुल हजारे यांनी संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले व येत्या काळात मागण्या मान्य न झाल्यास व्यवस्थेशी संघर्ष अटळ आहे,असे सुतवाच त्यांनी केले.
यावेळी मेंढपाळांना न्याय मिळवून देत उत्तम कामगिरी करणाऱ्या मेंढपाळ योद्यांचा मेंढपाळ आर्मीच्यावतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी मेंढपाळ आर्मीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, मेंढपाळ बांधव उपस्थित होते.
१ लाख मेंढपाळांची नोंदणी करण्याचा मेंढपाळ आर्मी चा निर्धार…
मेंढपाळांच्या मुलांना शाश्वत शिक्षणाचा अधिकार मिळवून देणार!

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक