तरंगफळ येथे गॅसच्या गळतीमुळे आईसह दोन मुलांचा मृत्यू

संजय हुलगे /माळशिरस तालुका प्रतिनिधी:

  माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसच्या गळतीमुळे अचानक लागलेल्या आगीमुळे आई व दोन मुले भाजली गेली आहेत. आई  सोनाली ज्ञानेश्वर शिंदे (वय 30), सावळा ज्ञानेश्वर शिंदे (वय 7) व कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे (वय 5) अशी भाजली गेलेल्या मुलांची नावे आहेत.यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला आहे.

      याबाबत मिळालेली माहिती अशी की, आई  सोनल सकाळी स्वयंपाक करत असताना अचानक गॅस गळतीमुळे आगीचा भडका होऊ लागला. आई घराच्या बाहेर होती व लहान मुले झोपलेल्या अवस्थेत होती. त्या मुलांना काढण्यासाठी आई घरामध्ये गेली. परंतु आगीचा भडका वाढत गेला होता. त्यामुळे दरवाजातून  बाहेर निघू शकत नसल्यामुळे गावकऱ्यांच्या साह्याने पाठीमागील भिंत पाडून दोन लहान मुले व आई यांना बाहेर काढण्यात आले.परंतु जास्त भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत होते. त्यांना अकलूज येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.परंतु तेथे एक मुलगा सावळा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला. आई व मुलगा कृष्णा यांना सोलापूर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे नेत असताना लहान मुलगा कृष्णा ज्ञानेश्वर शिंदे याचा मृत्यू झाला. आई सोनल  गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर उपचार चालू असताना सोनाली ज्ञानेश्वर शिंदे यांचाही मृत्यु झाला. या घटनेचा पंचनामा माळशिरसचे मंडळ अधिकारी लकडे यांनी केला आहे. यामध्ये घरातील  तीन लाख रुपयांचे तसेच शेजारील घराचे पन्नास हजार रुपये एवढे नुकसान झाले आहे.

गॅसमुळे लागलेल्या आगीत भडका होऊन स्फोट होऊ शकतो, म्हणून गावातील लोक भयभीत होऊन घराच्या बाहेर निघून जात होती. अशातच गावातील नामदेव एकनाथ कांबळे व पप्पू सर्जेराव कांबळे यांनी धाडस दाखवून  घरातील गॅसच्या दोन टाक्या बाहेर ओढून काढल्या व भिंत पाडून त्यांना बाहेर काढले .