त्याऐवजी ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ५ हजार रुपये पेन्शन द्या:जनता दलाची मागणी
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :
‘शरद शतम’ योजना म्हणजे शिळ्या कढीला ऊतू आणण्याचा प्रकार आहे,त्याऐवजी मंत्री धनंजय मुंढे यांना खरोखरच ज्येष्ठांचे अश्रू पुसायचे असतील तर ६० वर्षांवरील ज्येष्ठांना ५ हजार रुपये पेन्शन योजना लागू करा,अशी मागणी जनता दलाचे आटपाडी तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर यांनी केली आहे.
तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर म्हणाले,जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री धनंजय मुंढे यांनी ज्येष्ठांसाठी आरोग्य तपासणी व त्यावरील उपाय योजनांच्या दृष्टीने ‘शरद शतम’ नावाची योजना प्रस्तावित केली आहे. त्यासाठी राज्यस्तरावर उच्चस्तरीय समिती नेमली आहे.समितीच्या अहवालानंतर ही योजना मंत्रिमंडळासमोर ठेवली जाणार आहे. मान्यतेनंतर राज्यातील ६५ वर्षावरील ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या वर्षातून एकदा मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात मंत्री धनंजय मुंढे यांनी अशी माहिती दिली होती. ‘शरद शतम’ योजना म्हणजे जो एखादा मोठा पुढारीदेखील आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या गावात राबवतो, अशी आहे. मात्र याला राज्याचा दर्जा मिळणार आहे.
मंत्री धनंजय मुंढे यांनी घोषणा करण्यापूर्वी विचार करायला हवा होता की, फार वर्षापासून ही योजना शासकीय रुग्णालयात सुरू आहे. ६५ वर्षावरील सर्वांना कमी दरात व ज्यांच्याकडे केसरी, पिवळ्या रंगाची शिधापत्रिका आहे, त्यांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. त्यासाठी शरद पवार साहेबांचे नाव नव्यानेच देण्याची गरजच काय ? असा सवालही त्यांनी केला.
देशातील सर्व शासकीय दवाखाने गोरगरीब लोकांसाठी व जेष्ठांसाठी काँग्रेस व डाव्या पक्षांच्या काळातच सुरू केले आहेत. त्या दवाखान्यात आज रोजी लहान मुलांना सलाईन लावण्यासाठी लहान सुईदेखील नागरिकांना विकत आणावी लागत आहे. त्याची सोय मंत्री म्हणून प्रथम करावी, जुन्या योजनांची नावे बदलण्याचा सपाटा भाजपचा आहे, राष्ट्रवादी पक्षाचा नाही,असा टोलाही त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले, मंत्री धनंजय मुंढे यांना खरोखरच ज्येष्ठांचे अश्रू पुसायचे असतील तर राज्यातील ज्येष्ठांना दरमहा ५ हजार रुपये पेन्शन द्यावी. २०१४ व २०१९ ला ‘सत्ता द्या, पेन्शन देतो’ असा राष्ट्रवादी पक्षाचा जाहीरनामा होता, त्याची अंमलबजावणी करावी.
केंद्राकडून दरमहा पाचशे रुपये शेतकऱ्यांना निधी दिला जात आहे. निधी हा निधीच असतो, तो मनात आले की बंद होऊ शकतो.मंत्री धनंजय मुंढे हे ज्येष्ठांसाठी उच्चस्तरीय समिती नेमणार आहेत,त्यात त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते असणार आहेत.त्यातूनच त्यांचा पक्ष मजबूत होणार आहे.ज्येष्ठ नागरिक हे वाऱ्यावरच असणार आहेत. आपल्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी नेत्याचे नाव मंत्री मुंढे यांनी देणे बंद करावे, या योजनेला दिलेल्या नावापेक्षा कितीतरी पटीने शरद पवार साहेबांचे नाव मोठे आहे,याची जाण मुंढे साहेबांनी घ्यावी असेही शेवटी ते म्हणाले.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक