आटपाडी दि. 30 (प्रतिनिधी):

ग्रामपंचायतीकडील चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगातील निधीमधून पारंपरिक वाद्य व इतर कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबतच्या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शैलेंद्र ऐवळे,आबासो काटे,योगेश सावंत उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,हिंदू संस्कृतीच्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यात तसेच मनुष्याच्या जन्मापासून ते मरणापर्यंत गावगाड्यातील पारंपरिक सुरसनई ताफा वाजल्याशिवाय कोणताही धार्मिक विधी पूर्ण होत नाही. गावगाड्यातील या पारंपरिक वाद्यवृदांमुळे मांगल्याचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे त्याचे महत्व आजही टिकून आहे.समाजातील सर्वच घटकांना सरकारने मदत करून लॉकडाऊनच्या काळात अर्थसहाय्य केले आहे. परंतु प्रत्येक कार्यक्रमात सर्वात पुढे होऊन मांगल्याची सनई व इतर वाद्य वाजविणारे हे कलावंत सद्यपरिस्थितीत मदत मिळण्यापासून सर्वात मागे राहिल्याने उपेक्षितांचं जिणं जगत आहेत.गावगड्यातील भजनी मंडळ, कीर्तनकार, कथाकार, वाघ्या मुरळी, भारूडकार, वासुदेव, पिंगळा जोशी, हेळवी हे सर्वच कलाकार आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत. हे सर्व कलावंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ययुगीन कालखंडापासून पारंपरिक प्रथा व कला जपत असून हे सर्व बहुजन कलाकार हिंदू संस्कृतीतील महत्वाचे घटक आहेत.कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर हे सर्व कलाकार हाताला कामधंदा नसल्याने व कार्यक्रमाची मागणी नसल्याने साध्या दोन वेळच्या अन्नाला महाग झाले आहेत.
14 व्या व 15 व्या वित्त आयोगाचा बराचसा निधी ग्रामपंचायतीकडे शिल्लक आहे. या निधीतून पारंपरिक प्रथा , परंपरा जोपासून हिंदू संस्कृतीचं रक्षण करणाऱ्या या गावगड्यातील, बारा बलुतेदार बहुजन समाजातील कलावंतांना भरघोस आर्थिक सहाय्य मिळाल्यास त्यांचे दुःख थोडं फार दूर होईल. या कलावंतांना 14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधीतून आर्थिक मदत देण्यास ग्रामपंचायतींना आदेश द्यावेत अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती