
हायकोर्टाचा लक्षवेधी निकाल
सुरक्षा देण्याचे न्यायालयाचे आदेश
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चंदिगढ :
एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं असेल तरी त्याने इतर जोडीदाराशी परस्पर सहमतीने संबंध ठेवणे,हा गुन्हा होत नाही,असा निकाल हायकोर्टाने दिला आहे.
पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात एका प्रकरणाच्या सुनावणीत हे मत नोंदवण्यात आलं असून अशा प्रकारात जोडप्याला सुरक्षा मागण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं आहे.
घटस्फोटासाठी अर्ज केलेला एक तरुण सध्या दुसऱ्या तरुणीसोबत राहत असून पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा त्याने केला आहे.त्यामुळे आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी,अशी मागणी त्याने न्यायालयाकडे केली आहे.यावर न्यायालयाने त्याला सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.
लग्न झालेली व्यक्ती जर आपल्या जोडीदाराशिवाय इतर कुणाशी लैंगिक संबंध ठेवत असेल,तर अशा व्यक्तींना सुरक्षा देण्याची गरज नसल्याचा निकाल यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टाने दिला होता.सरकारी वकिलांनी या निकालाचा संदर्भ पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात दिला.मात्र त्या निकालाशी आपण सहमत नसून सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड विधानाचं कलम ४९७ हे असंवैधानिक असल्याचं म्हटल्याचा संदर्भ हायकोर्टाने दिला.
एखाद्या प्रौढ व्यक्तीने परस्पर सहमतीने इतर व्यक्तींशी संबंध ठेवणे,हा गुन्हा नसून अशा व्यक्तींच्या जीवाला धोका असेल,तर सुरक्षा पुरवणे योग्यच असल्याचं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे.या केसमधील तरुणाने घटस्फोटासाठी अर्ज केला असून त्याचा निकाल प्रलंबित आहे.मात्र सध्या तो सहमतीने वेगळ्या तरुणीसोबत राहत असून त्याला सुरक्षा नाकारण्यासाठी कुठलेही कायदेशीर कारण दिसत नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक