

तडवळेत मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला !
आठ मेंढ्या ठार,पाच बेपत्ता!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
आटपाडी तालुक्यातील करगणी (तडवळे) येथे मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांने हल्ला केल्याची घटना घडली.त्यामध्ये आठ मेंढ्या ठार झाल्या असून पाच बेपत्ता आहेत.
याबाबत याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेंढपाळ मल्लाप्पा पडवळे, नवला मुरारी कोळेकर, शंकर बंडगर, संदीप खांडेकर या सर्व मेंढपाळांचा दत्तात्रय नामदेव शेंडे रा. तडवळे यांच्या करगणी येथील गोसावी वस्तीजवळील हुंबरवाडा नावाच्या शेतात खतासाठी मेंढ्यांचा तळ होता. रविवार दि.५ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला झाला. मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लावलेली जाळे-वागर लांडग्यांनी तोडून कळपात प्रवेश केला आणि पाच मोठ्या मेंढ्यांना व तीन लहान पिलांना ठार केले. तर पाच मेंढ्या बेपत्ता आहेत. मेंढ्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने मेंढपाळ जागे झाले.पाहतात तर काही लांडगे बकऱ्यांना तोंडात धरून घेऊन पळून गेले. दोन बकरी पुर्ण खाऊन फस्त केली आहेत. या हल्ल्यात मेंढपाळांची सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हल्ल्याची घटना मेंढपाळांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना व यशवंत क्रांती संघटना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस राम कोळेकर, शेंडूर शाखाध्यक्ष राजाराम हजारे यांनाही कळवली. तसेच संजय वाघमोडे यांनी मेंढपाळांना धीर देऊन आटपाडी तळवडे वनरक्षक अंबिका तळे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश चव्हाण यांना कळवून नुकसान भरपाईसाठी रीतसर पंचनामा करण्याची विनंती केली.
लगेचच वनपाल पांडुरंग बाळू बालंडे, वनरक्षक अंबिका भगवान तळे,वनमजूर सुखदेव जगन्नाथ माळी व जितेंद्र शिवाजी गिड्डे,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गाढवे, डॉ. अविनाश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी व वनकर्मचारी,रासपा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, यशवंत क्रांती संघटना कोल्हापूरचे सरचिटणीस राम कोळेकर तात्काळ घटनास्थळी हजर राहिले. त्याबद्दल मेंढपाळ यांनी यशवंत क्रांती संघटना पदाधिकारी व अधिकारी यांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन