तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर उपोषण स्थगित!

महसूल विभागाच्या मध्यस्थीमुळे साखळी उपोषणाची यशस्वी सांगता!
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अमरावती /चांदूर बाजार (कृष्णापुर) :

चांदूर बाजार तालुक्यातील बेलोरा ब्राह्मणवाडा थडी व आसेगाव पूर्णा या तिन्ही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना २०२०-२१ यावर्षीचा पिक विमा न मिळाल्यामुळे शेतकर्‍यांनी वेळोवेळी निवेदने,आंदोलने केली असून त्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक लावण्याबाबत लिखित स्वरूपात आश्‍वासन दिले होते. परंतु त्यावर भरपूर वेळ जाऊनसुद्धा कृषी विभागाने आपल्या आश्‍वासनाची पूर्ती न केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने २३ऑगस्ट पासून चांदूर बाजार तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली. परंतु वरिष्ठांकडून आणि स्थानिक प्रशासनाला लवकरात लवकर हा विषय मार्गी लावण्यासाठी बैठक लावण्यासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्यासोबत चर्चा करून साखळी उपोषण समाप्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने महसूल विभागाने तहसीलदार यांना सदर शेतकऱ्यांबाबत चर्चा करून व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या लेखी पत्रानुसार आम्ही स्वतः लक्ष घालून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत अवगत करून लवकरात लवकर बैठक लावण्याचे आश्वासन देऊन उपोषण समाप्त करण्याची विनंती केली. त्याप्रमाणे शेतकऱ्यांनी तहसीलदार त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून दि. २३ पासून सुरू झालेले साखळी उपोषण काही काळासाठी स्थगित केले असून येणाऱ्या काही दिवसात जिल्हाधिकारी यांचेसोबत बैठक न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले जाईल, असेही सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार व उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले व उपोषणाची सांगता केली.