
माळशिरसमध्ये ओबीसी आरक्षणासाठी भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाले असून, या विरोधात भारतीय जनता पार्टीने माळशिरस येथे श्रीनाथ चौकामध्ये ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन केले. माळशिरस नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मुंडण करून सरकारचा निषेध केला.यावेळी आमदार राम सातपुते,भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती सदस्य के.के.पाटील, माजी तालुका अध्यक्ष सोपान काका नारनवर,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर,ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे,माळशिरस संघटन सरचिटणीस संजय देशमुख,हनुमंत सुळ,संजय जगताप,डॉ.अक्षय वायकर,बी.वाय.राऊत,लक्ष्मण गोरड,शेकडो कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहूमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला हार घालून करण्यात आली. या चक्काजाम आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना,भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख म्हणाले की,ओबीसी आरक्षण हे राज्यातील रद्द झालेले आहे.त्यामुळे केंद्राकडे बोट दाखवू नका.ओबीसी समाजाला राजकारणातून हद्दपार करण्याचा राज्य सरकारचा डाव उधळून लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाजाचे नेतृत्व सरकारमधून कमी होणार तर याचा फटका ओबीसी विद्यार्थ्यांनादेखील बसणार तसेच ओबीसी नेत्यांना जर ओबीसी समाजाबद्दल एवढाच पुळका असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडून आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा असे आवाहन केले. त्याचबरोबर ‘अशा दळभद्री सरकारचं करायचं काय?’ अशा घोषणा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी दिल्या.
यावेळी आमदार राम सातपुते,जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समिती सदस्य के.के.पाटील,हनुमंत सुळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.हे आंदोलन जवळपास तीन तासांहून अधिक चालले. अखेर तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारून आंदोलन थांबविण्याची विनंती केली.पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता .


संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद