आशा कर्मचाऱ्यांचा आजपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप!

सांगली जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक सिटूच्या नेतृत्वाखाली होणार संपात सहभागी !

अनिल मदने

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

आशा कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी 15 जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सिटू इतर विविध संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांकडून अत्यंत जीव जोखमीत घालणारी कामे करून घेतली. मात्र या कामाचा कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नाही. माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेचे कामही अतिरिक्त मोबदला न देता करून घेण्यात आले. आता रॅपिड अँटीजेन टेस्ट घरोघरी जाऊन करण्याची जबाबदारीही आशांवर टाकण्यात येत आहे. कोविड काळात जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या राज्यभरातील आशा व गट प्रवर्तकांवर  होणारा अन्याय सहन करणे अशक्य असल्याने सिटू व समविचारी कामगार संघटनांनी बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. कोविड काळातील कामाचा अतिरिक्त मोबदला द्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी  या मोहिमेचा स्वतंत्र मोबदला द्या, आशा व गटप्रवर्तकांना कायम नियुक्तीची पत्रे द्या, आशा व गटप्रवर्तक यांच्या नियमित वेतनात भरीव वाढ करा या प्रमुख मागण्यांसाठी हा संप होत आहे. सांगली जिल्ह्यातील आशांनी एकत्र येत या संपात सहभागी होत असल्याचे निवेदन आज जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले.यावेळी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेत्या  मिना कोळी, सुरेखा जाधव,अंजू नदाफ, दिपाली होरे ,शबाना आगा, लता जाधव, अनुपमा गौंड,कॉ.हणमंत कोळी जिल्हा संघटक यांच्यासह मोठ्या संख्येने आशा  व गटप्रवर्तक उपस्थित होत्या. किसान सभेचे राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख ,जिल्हा सेक्रेटरी दिंगबर कांबळे ह्यांनी यावेळी आशा कर्मचाऱ्यांच्या संपाला किसान सभेच्या वतीने संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.